क्राइम न्यूज : बस मध्ये चोऱ्या करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पोलिसांच्या हाती लागली



प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी ( मुन्ना) शेख :

 पुणे - पीएमपीमधील प्रवासी महिला आणि चालकाच्या सतर्कतेमुळे बस मध्ये चोऱ्या करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून चोरीचे मंगळसूत्र आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे.अक्षय दत्ता जाधव (22), राहुल इश्वर सिध्दापुर (27 दोघेही रहाणार सर्वोदय कॉलनी मुंढवा ) तसेच महिला आरोपी निला सचीन गायकवाड (33 सध्या रा.सर्वोदय कॉलनी मुंढवा, मुळ अंबरनाथ ठाणे), नंदा महादेव गायकवाड (47, सध्या रा.सर्वोदय कॉलनी, मुंढवा, मुळ सोलापूर) पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, काशिनाथ पाटील नगर, धनकवडी येथे रहाणारी एक 30 वर्षीय महिला शनिवारी सायंकाळी टिळक रोडवरील हिराबाग बस स्टॉप ते बालाजीनगर असा पीएमपीएमएल बसमध्ये बसुन प्रवास करीत होत्या. त्या शंकरमहाराज मठ येथे आल्या असता, आरोपींनी त्यांना धक्का बुक्की करुन जबरदस्तीने त्यांचे गळयातील 40, हजार रुपये किमतीचे 1 तोळा वजनाचे मंगळसुत्र व पर्समधील 4 हजार 500 रुपये रोख रक्कम असा एकुण 44 हजार 500 रुपये किमतीचा माल चोरला.

फिर्यादी व बसमधील प्रवाशांनी आरडाओरड केल्याने बस ड्रायवरने बसची दारे तातडीने बटन दाबून लॉक केली. यानंतर बस थेट सहाकारनगर पोलीस स्टेशन येथे आणली. तेथे पोलिसांना घडला प्रकार सांगण्यात आला. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बस मधील 50 ते 60 प्रवाशांचे ओळखपत्र पाहुन तपासणी केली. यावेळी चारही आरोपी चोरीस गेलेल्या मालासह रंगेहात सापडले.

यातील अक्षय जाधव आणि राहुल सिध्दापुर हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर प्रत्येकी 9 गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे सोलापूर, खडक, विमानतळ, बंडगार्डन आदी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यातील राहुल आणि नंदा गायकवाडे हे बहिण भाऊ आहेत. तर नीला ही नंदाची मैत्रीण आहे. हे सर्व एकत्र राहुल टोळीने बसमध्ये चोऱ्या करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यातील फिर्यादी या बाजीराव रस्त्यावरील एका पुस्तकाच्या दुकानात काम करतात. त्यांना नेहमी पती दुचाकीने कामावर सोडतात. मात्र घटनेच्या दिवशी पतीला काही काम असल्याने त्या पीएमपीचे प्रवास करत होत्या. त्यांना मंगळसूत्र कट केल्याची जाणीव होताच त्यांनी आरडा ओरडा केला. तेव्हा त्यांच्या आजूबाजूला घोळका करुन असलेल्या आरोपींनी आम्ही काहीच केले नसल्याचे सांगत गोंधळ घातला होता. मात्र पीएमपी चालकाच्या कानावर गोंधळाचा आवाज येताच त्याने तातडीने बसचे दोन्ही दरवाजे बटणाने बंद केले. यामुळे बसमधुन कोणालाही बाहेर पडता आले नाही.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युनुस मुलानी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, अनिल माने, पोलीस हवालदार बापु खुटवड, अमोल गुरव, सोपान नावडकर, पोलीस नाईक महादेव नाळे, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदिप बेडीस्कर, सागर सुतकर, शिवा खेड, महीला पो.हवा. सुरेखा अनपट, मनीषा कारंडे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post