प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे : राजकीय मतभेदातून आरोप-प्रत्यारोप करताना शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत सध्या वापरत असलेली शिवराळ भाषा चुकीची असल्याचे मत केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.तसेच आगामी पुणे महापालिका निवडणुक भाजप सोबत लढवणार आहोत.
पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला किमान 25 जागा मिळाल्या पाहिजेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. पुणे महापालिका निवडणूक आम्ही एकत्र लढू आणि जिंकून येऊ असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशा सह देशातील पाच राज्यात सध्या निवडणुका सुरु आहेत. या पाचही राज्यात भाजपसोबत आम्ही आहोत. या सर्व ठिकाणी भाजपसोबत सत्तेत येऊ, असेही आठवले यांनी सांगितले.
आठवले पुढे म्हणाले, सत्तेत असलेल्या लोकांनी अधिक जबाबदारीने बोलले पाहिजे.सत्तेत असताना उलट-सुलट बोलणं पूर्णत: चुकीचे आहे. टीका करताना किंवा कुणा विषयी बोलताना त्याचा बाप काढण्याची गरज काय ?असा सवाल त्यांनी केला. भाजप – शिवसेनेतील वाद मिटण्यासाठी आपण प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, भाजप – शिवसेनेची अनेक वर्षांची दोस्ती आता दुष्मनीत बदलली असून यातून मार्ग काढला पाहिजे. याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. दोन्ही पक्षातील वाद मिटला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.