काल तक्रार आज पाठिंबा
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : जिलानी (मुन्ना) शेख :
पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने महापलिकेत वेगवेगळ्या प्रकरणावर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या कधी भाजपा के साथ आणि कॉंग्रेस के खिलाफ चे धोरण पत्करलेल्या या पक्षाचे नेते ,नगरसेवक भाजपबरोबर जाताना शिवसेनेच्या विरोधातही कधी कधी उभी राहिल्याचे स्पष्ट झालेले आहे.सभागृहात एक भूमिका , महापौरांच्या अँँटीचेम्बर मध्ये दुसरी भूमिका आणि बाहेर तिसरी भूमिका घेणाऱ्या या पक्षाच्या नेत्यांनी वारंवार रंग बदलले हे घडत असताना अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली पण नेत्यांपुढे जाऊन ठाम राहण्याचे धारिष्ट्य कोणी दाखविले हीच स्थिती अगदी महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाही बदलली नाही हे खूपच महत्वपूर्ण मानावे लागणार आहे .
परवा नदी सुधारणा प्रकल्पाला आणि गुजरात दौऱ्यावरून या पक्षाच्या या प्रकल्पाबाबतच्या धोरणाला विरोध करणाऱ्या आणि एकूणच या प्रकल्पाबाबत संशयाची भूमिका वारंवार अधोरेखित करणाऱ्या या पक्षाने प्रत्यक्षात एसीबी कडे तक्रार केली तेव्हा या प्रकल्पाचा साधा उल्लेख देखील केला नाही राष्ट्रवादीने संशयित म्हणून उपस्थित केलेल्या निविदांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये नदी सुधारणा प्रकल्प सर्वाधिक खर्चाचा म्हणजे पावणेपाच हजार कोटीचा प्रकल्प आहे .आजच्या मुख्य सभेत तर त्याही पुढे या पक्षाने मोठ्ठी छलांग मारली. काल त्यांनी एसीबी कडे ज्या प्रकल्पाबाबत संशय व्यक्त करणारी हरकत घेऊन ज्याच्या चौकशीची मागणी केली आज त्याच प्रकल्पाला चक्क पाठींबा देऊन त्याबाबतचा सुमारे १ हजार कोटीचा प्रस्ताव संमत केला .
वारजे आणि बाणेर- बालेवाडी येथे सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून पीपीपी तत्वावर बांधण्यात येणार्या हॉस्पीटलचे काम ठराविक कंपन्यांना डोळ्यासमोर ठेउन करण्यात येत असल्याची चौकशी करावी अशी मागणी अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) कडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने केली होती पण चोवीस तासांच्या आतच या पार्टीच्या नेत्यांनी , आणि त्यांची भूमिका काल जाहीर होऊनही आज त्यांच्या नगरसेवकांनी देखील घुमजाव केले आहे.यामुळे अगदी शेवट्च्या क्षणापर्यंत 'घुमजाव' च्या भुमिकेमध्ये यांनी सातत्य ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे. अशा पक्षाबरोबर शिवसेना आणि कॉंग्रेस येत्या निवडणुकीत आघाडी करणार काय ? केली तर कुठे कुठे काय होईल ? हे सांगायला आता कुठल्याही तज्ञ अशा समीक्षकांची आवशक्यता भासणार नाही .
स्थायी समितीमध्ये वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल तर बाणेर- बालेवाडी येथे कॅन्सर हॉस्पीटल उभारणीचा प्रस्ताव आठवडाभरा पुर्वी मंजूर करण्यात आला. पीपीपी तत्वावर उभारण्यात येणार्या या हॉस्पीटलसाठी महापालिका केवळ जागा देणार असून ही हॉस्पीटल उभारणी करणार्या कंपन्याच पुढील ३० वर्षे सर्व व्यवस्थापन पाहील. यासाठी या कंपन्या जे कर्ज काढतील या कर्जाची महापालिका गॅरंटी घेणार. तसेच या रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या वतीने पाठविण्यात येणार्या रुग्णांवर अत्यल्प दरात उपचाराची सुविधाही देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून परवानगी घेण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे होता.दरम्यान, दोनच दिवसांपुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव ठराविक कंपन्या डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या पदाधिकार्यांनी पुढील पिढ्यांच्या अर्थार्जनाची सोय केल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर यासह मागील पाच वर्षात मंजुर झालेल्या प्रकल्पांमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची चौकशी करावी, असे निवेदन पुणे एसीबी अधिक्षक कार्यालयात दिले आहे. यानंतरही आज सर्वसाधारण सभेत मात्र प्रस्तावांना पाठींबा दिल्याने
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने पुन्हा एकदा घुमजाव केल्याचे समोर आले आहे.
यापुर्वीही कोरोनावरील कॉफी टेबल बुकसह अन्य प्रस्तावांना अगोदर विरोध आणि नंतर पाठींबा दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
या प्रस्तावाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या परवानगीनंतरच करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिल्यानंतर अन्य विरोधी पक्षांचेही समाधान झाले.काल हि असंख्य नगरसेवकांचे महापालिकेच्या जागा नाममात्र दराने मिळण्याबाबतचे प्रस्ताव संमत करण्यात आले त्यास राष्ट्रवादीच्या वतीने तातडीने अनुमोदन देण्यात येत होते . अन्य पक्षांनी हरकत घेताच सभागृहनेते जागा वाटप नियमावली नुसार जागा देण्यात येतील असे सांगत होते पण ते तोंडी होते , कोणत्याही विषयपत्र तसे नमूद नसल्याने अशा सर्व प्रस्तावांची अंमलबजावणी अखेरीस प्रशासनाला हाताशी धरूनच केली जाईल असे दिसते आहे. शेवटी राजकारणात काहीही होऊ शकते.