मूलनिवासी मुस्लिम मंचाची मागणी....
प्रेस मीडिया ऑनलाइन :
पुणे : इमारतीच्या पायाभरणीचे काम सुरू करताना बांधकाम व्यावसायिक व अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे कोणत्याही प्रकारची सुरक्षितता लक्षात न घेता, खाली पाया उभारताना केवळ वेल्डिंगच्या सहाय्याने घोडीचा वापर करण्यात आला नाही, त्यामुळेच वेल्डिंग तुटल्याने 80 टन लोखंड थेट खाली काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडले. गरीब मजुरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे, अशी मागणी मूलनिवासी मुस्लिम मंच अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी केली.
बांधकामाचे सर्व नियम पाळले गेले नाहीत. बिहार कटिहार जिल्ह्यातील तरुण मजुरांना केवळ 300000 किंमतीचे स्टील वाचवण्याच्या नादात आपले प्राण गमवावे लागले, असा आरोप त्यांनी केला.
1. मोबिद आलम, (वय 40 ) 2. ताजीब मोहम्मद शाहिद आलम (17 ) 3. मोहम्मद सोहिल मोहम्मद शेख, (वय 22) 4. मोहम्मद शमीम (वय 35) 5. मजरूम हुसेन, (वय 35, सर्व जण मूळ राज्य बिहार) हे अपघातात मरण पावले होते.
अंजुम इनामदार यांच्या पुढाकाराने माजी नगरसेवक हनीफ शेख, खिसाल जाफरी, सलीम शेख, अमजद शैख, परवेज तंबोली, इलियास शेख आदी सर्व कार्यकर्त्यांच्या आणि पुणे पोलिसांच्या 24 तासांच्या अखंड परिश्रमानंतर 4 तारखेला रात्री 11:00 वाजता 5 रुग्णवाहिकांमधून 5 मृतदेह बिहारच्या कटिहार जिल्ह्यात पाठवण्यात आले. पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत म्हणून बिल्डरकडून म्रुत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला 50 हजार देण्यात आले. पुण्याहून बिहारला रुग्णवाहिकेतून मृतदेहांसह 19 जणांना आपापल्या गावी पाठवण्यात आले.
आयपीएस अधिकारी रहमान, खासदार तारिक अन्वर, एम आय एम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार अख्तरुल इमान, युवा अध्यक्ष आदिल हसन यांच्याशी संपर्क साधला. सतत बिहार मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या संपर्कात राहून पुणे जिल्हा अधिकारी, पुणे पोलिसांना संपूर्ण मदत केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या कानी ही बाब घालण्यात आली. त्यांना तातडीने संबंधित कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
अंजुम इनामदार म्हणाले की, राज्य सरकारच्या या घोषणेवर आम्ही समाधानी नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. बिल्डर आणि अभियंता यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवावे, अशी मागणी आम्ही पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गरीब मजुरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे.