प्रेस मीडिया लाईव्ह ,:
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे – निवडणूक आयोगाने चाचणीसाठी गट, गणांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. गट संख्या निश्चिती झाली तरी आरक्षणाचे काय ? कोणते गाव कोणत्या गट अथवा गणाला जोडले या बाबत कमालीची उत्स्कुता ताणली गेली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करताना मोठे बदल आयोगाने केले होते, त्यामुळे पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट आणि गणांत मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या बड्या पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी आपल्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. आगामी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचे प्रारूप आराखडे चाचणीसाठी तयार केले असून अद्याप प्रारुप आरखड्याची तारीख जाहीर झाली नसल्याने गट आणि गणांबाबत संभाव्य उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे.
भावी सभापती, भावी जिल्हा परिषद सदस्यांचे समर्थक आराखडे बांधू लागले आहेत. गट आणि गणाचा अंदाज घेत प्रतिनिधींना, अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीयाशी संपर्क साधला जात आहे. तर गाव पातळीवरील ग्रामपंचायती, सरकारी संस्थांनंतर “मिनी विधानसभा’ असलेल्या जिल्हा परिषद गटावर अनेक मातब्बर मंडळींचे लक्ष आहे. मानाचे पद असलेल्या या पदावर वर्णी लागावी यासाठी गेल्या पाच वर्षांपासून काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुकांनी सोशल मीडियावरून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आजी-माजी उमेदवारांविरुद्ध नागरिकांचा कौल घेण्यासाठी इच्छुकांकडून सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या जाताहेत. सकारात्मक बाजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लाईक्स, कमेंटसाठीही इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.