पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघाचा पुढाकार
'शहर विकासावर नागरिकांचा प्रभाव हवा ':मेळाव्यातील सूर
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा जाहीरनामा तयार करण्यासाठी पुणेकर नागरिकांचा 'अपेक्षा जागर मेळावा ' आयोजित करण्यात आला होता, या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.सुशिक्षित,चारित्र्य संपन्न नगरसेवक निवडून द्यावेत,वॉर्ड सभा व्हाव्यात,जाहीरनाम्यांकडे गांभीर्याने पाहिले जावे,शहर विकासावर नागरिकांचा प्रभाव हवा असा सूर मेळाव्यात उमटला.
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघाने त्यासाठी पुढाकार घेतला.पुणेकर नागरिक,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी,गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन,रवींद्र धारिया,शमसुद्दीन तांबोळी,विवेक वेलणकर,सकाळचे संपादक सम्राट फडणीस,महाराष्ट्र टाईम्स्चे निवासी संपादक श्रीधर लोणी,एड.वसंत कर्जतकर,डॉ.नरेंद्र पटवर्धन,एड. श्रीप्रसाद परब हे मान्यवर देखील सहभागी झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक धिवरे (माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक ) होते.
मराठी बांधकाम असोसिएशनचे नंदू घाटे,महेश धर्माधिकारी,इंद्रनील सदलगे,अविनाश हवळ,सुधीर पवार,शैलेंद्र पटेल,मुकुंद शिंदे,हनुमंत बहिरट, यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यात नागरिकांच्या मनातील सूचना मांडल्या.सूत्रसंचालन सुनील जोशी यांनी केले.प्रास्ताविक व आभार सुहास पटवर्धन केले.
मनोहर मंगल कार्यालय (मेहेंदळे गॅरेज) एरंडवणे पुणे येथे दि.२३ फेब्रुवारी (बुधवार) सायंकाळी ५ ते ७ या वेळात हा मेळावा झाला.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि त्या अनुषंगाने नागरिकांच्या मनात ही आपल्या प्रभागातील उमेदवाराकडून मूलभूत विकास आणि नागरी सोयी संदर्भात निश्चितच काही अपेक्षा आहेत.त्या अपेक्षा आणि नागरिकांची भूमिका समजावून घेण्यासाठी पुणेकर नागरिकांचा मतदार अपेक्षा जागर मेळावा आयोजित करण्यात आला. विविध समविचारी संस्था, नागरी समस्या आणि त्यावर उपाय योजना करणारे अभ्यासक, निवृत्त सेवाभावी अभ्यासक यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विवेक वेलणकर म्हणाले,"पिशव्या, भांडी, बाकडे असल्या गोष्टी नागरिकांनी नगरसेवकांना मागू नये आणि त्यांनी दिल्या तरी त्या भीक म्हणून घेऊ नये. कारण तो सर्व पैसा नागरिकांचाच असतो.कोणत्याही गोष्टींना संकल्पना म्हणून नगरसेवकांनी त्यांची स्वतःची नावं टाकू नयेत, असली चीप पब्लिसिटी नागरिकांच्या पैशांवर नगरसेवकांनी करू नये.दर दोन वर्षांनी रस्त्यांच्या टाईल्स बदलण्याची गरज नसताना बदलल्या जातात, हे होता कामा नये."
डॉ. नरेंद्र पटवर्धन म्हणाले, 'मेट्रोच्या नावाखाली पुणेकरांना अक्षरशः लुटले जात आहे. शहराचे विद्रूपीकरण होत आहे, गटारांची झाकणे इतकी धसली आहे ते कि वाटते एखाद्या ठिकाणी गटारात पडून दुसऱ्या कुठेतरी निघू"
शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, 'नागरिकांच्या जाहिरनाम्याने प्रभावी दबाव गटासारखे कायमस्वरूपी काम केले पाहिजे.हा दबाव गट निवडणूकीत पुरता मर्यादित न राहता त्या नंतर ही अनेक शहर सोयी सुविधांसाठी या दबाव गटांचा उपयोग करता येईल"
नितीन पवार म्हणाले, 'पुणे शहर ही 'डीसेंट वर्क सिटी' झाली पाहिजे सध्या शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे.नागरिकांच्या जाहिरनाम्या निमित्ताने सुरू झालेला नागरिकांच्या एकीकरणाचा संवाद पुढेही चालू राहावा"
श्रीधर लोणी म्हणाले, ' नागरिकांच्या मुलभूत गरजा आणि प्रश्नांना कधी नव्हे ते आता वृत्तपत्र अधिक लक्ष देऊ लागली आहेत. त्यामुळे आज सर्वत्र सिव्हीक जर्नालिझम केंद्र स्थानी असल्याचे दिसून येते. पुण्यातील रस्त्यांवर आजकाल सर्रास इतके काम चालू असते कि वाटते पुण्यातील रस्ते कायम निर्माणाधीन अवस्थेत असल्याचे दिसून येते. ही अतिशय दुदैवी बाब आहे.ड्रेनेज च्या दुरावस्थेमुळे अनेक रस्ते असमान झाले, त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत, तसेच अशास्त्रीय स्पीडब्रेकर मुळेही अनेक अपघात घडत आहेत.गेल्या पंधरा वीस वर्षांतील पुण्यातील चित्र पाहायला गेल्यास, पुणेकर आपल्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवताना दिसत नाहीत. प्रश्न उपस्थित करण्या ऐवजी भलतेच वादविवाद वाढून मूळ प्रश्न हरवून जातात"
सम्राट फडणीस म्हणाले,'शहराच्या विकासासाठी तरुणांची मते विचारात घेत त्यांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे .राजकीय नेत्यांवर फक्त टीका न करता चर्चेतून प्रश्न सोडविले पाहिजेत. नागरिकांच्या जाहिरनाम्याची कल्पना चांगली आहे, पण याचे चांगले परिणाम दिसायला सातत्याने पाठपुरावा केला तर पुढील १०/१२ वर्षे जावी लागतील.वृत्तपत्र क्षेत्रात वाचकांचा पत्र व्यवहार याला फार महत्त्व दिले जात नाही. पण खरंतर याच सदरासाठी शहरातील खर्या मूळ समस्यांचा अभ्यास असणारी ज्येष्ठ मंडळी लिहीत असतात,त्यामुळे हा पत्र व्यवहार पाहाण्यासाठी आता आम्ही अधिक प्रगल्भ व्यक्तीची नियुक्ती केली आहे."
रवींद्र धारिया म्हणाले,'शहरातील वीज, पाणी, नदी प्रदूषण असे अनेक प्रश्न आहेत, पण हे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांचे एकत्रित येणे आवश्यक असून त्यांच्यामध्ये या प्रश्नांविषयी जाणीव, जागृती करणे महत्त्वाचे आहे.नदी प्रदूषित करणारे आंबिल ओढ्या सारख्या मूलस्रोत प्रदूषित होणार नाही, याची खबरदारी म्हणून तेथील स्थानिक नागरिकांची या प्रश्नाचे दृष्टीने जागृती होणे,करणे गरजेचे आहे.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना अशोक धिवरे म्हणाले,"पोलीस हा समाजाचा अजूनही भाग झालेला नाही, तो जर खर््याअर्थाने समाजाचा भाग, घटक झाला तर अनेक समस्या सुटतील. पक्षीय ध्येय धोरणं, आयडियालॉजी पासून दूर राहूनच मतदान केले पाहिजे, माझ्या मताचा माणूस निवडून आला कि झाले असा स्वार्थी विचार न करता तो नेता सर्व देशाच्या आणि लोक कल्याणासाठी योग्य आहे का, हे पाहणे आणि त्या दृष्टीने मतदान करणे आवश्यक आहे.
यावेळी मुकुंद शिंदे, ॅअड प्रसाद परब, अविनाश हावळ (लोकविज्ञान चे सचिव), आरोग्य सेनेचे अतुल रूणवाल, हनुमंत बहिरट अदिंचीही भाषणे झाली. लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी चे व्यवस्थापक श्रीकांत देशपांडे यांनी ही आपले विचार मांडले.
नागरिकांनी आपल्या सूचना मार्गदर्शक उपक्रम आणि लोकापयोगी कल्पना लेखी स्वरूपात द्याव्यात. या जनजागृती आणि विचार मंथन उपक्रमातून मिळणाऱ्या सूचना आणि मार्गदर्शक उपक्रमांचा अभ्यास करून नागरिकांचा जाहीरनामा तयार करण्यात येईल.
लायन्स, रोटरी क्लब, व्यापारी, रिक्षा हमाल, पत्रकार, डॉक्टर लेखक, बांधकाम व्यावसायिक, वकिल, वास्तूविशारद, बँका, विमा कंपन्या, हास्य क्लब, महिला मंडळे, जेष्ठ नागरिक संघटना, निवृत्त सरकारी निमसरकारी, सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, पर्यावरण इ. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे..
9607505363 या व्हॉटस अप क्रमांकावर आणि Punefed@gmail.com या ईमेलवर देखील नागरिकांना सूचना पाठवता येतील.
संस्थेविषयी ः
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ गेली ४७ वर्षे पुणे जिल्हयातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना मार्गदर्शन करीत आहे. राजकीय पक्ष, जात, भेद यापासून अलिप्त आहे.