बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार, काही जणांविरोधात गुन्हा दाखल
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी (मुन्ना) शेख :
पुणे : पुण्यातील येरवडा भागात निर्माणाधीन इमारत कोसळल्याने सहा मजुरांचा मृत्यू झाला होता. या बिल्डिंगचा स्लॅब पडल्याने दुर्घटना घडली. रात्रीच्या वेळी हा प्रकार झाल्याने मदत पोहोचण्यासही उशीर झाल्याचं स्थानिकांनी सांगितलंया प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मृत मजुरां प्रती शोक व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणात चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणात आता पोलिसांनी तत्काळ सूत्र हालवत बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार, पर्यवेक्षक, सुरक्षा अभियंता आणि बांधकाम साइटशी संबंधित काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४, ३३६, ३३७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे.
स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्लॅबचा ढिगारा आणि सळयांमध्ये अडकलेल्या कामगारांना पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आले. काही कामगार या सळयांमध्ये अडकल्याने सळया कापून त्यांना बाहेर काढल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
शास्त्रीनगर चौकतील वाडिया बंगला गेट नंबर आठ येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते. काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या चार ते सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व जवानांनी कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.