शहरात बसवलेले सीसीटीव्ही चोर पकडण्यासाठी...?

 विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्यांना दंड करण्यासाठी.... आम आदमी पार्टीचा सवाल.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी (मुन्ना) शेख :

पुणे : शहरात बसवलेले सीसीटीव्ही चोर पकडण्यासाठी आहेत की, विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्यांना दंड करण्यासाठी असा सवाल आम आदमी पार्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.गत फक्त १ वर्षात शहरामध्ये विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या १८ लाख १९५ जणांना तब्बल ८९ कोटी ९६ लाख ५ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

त्यावरूनच आम आदमी पक्षाच्या युवा शाखेचे कात्रज येथील कार्यकर्ते कृष्णा गायकवाड यांनी पवार यांना हा प्रश्न केला आहे. ज्यांना दंड होतो त्यांच्या घराच्या पत्त्यावर दंडाची पावती येते व त्या पावतीवर सीसीटीव्हीने टिपलेले छायाचित्र असते. एका उद्योजकाच्या लहान मुलाच्या अपहरण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज मिळाले, पण पोलिसांना आरोपी पकडता येईनात आणि पुणे शहरात हेल्मेट सक्ती लांबवणीवर टाकलेली असतानाही तो दंड मात्र सर्रासपणे केला जातो असे गायकवाड यांचे म्हणणे आहे.

सीसीटीव्ही सर्वसाधारणपणे शहरातील गल्लीबोळांमध्ये बसवले जातात. त्यातही ज्या ठिकाणी वर्दळ नसते तिथे काही गुन्हा होऊ नये, झाल्यास गुन्हेगार पडकला जावा असा हेतू त्यामागे आहे. पुणे शहरात मात्र चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. त्यातून वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करणे हाच उद्देश दिसत असल्याचा आरोप आम आदमीने केला आहे.

जिल्हा प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी याबाबत बोलताना सांगितले की वाहतूक शाखेने कारवाई करण्याबाबत काहीच म्हणणे नाही किंवा त्याला विरोधही नाही. मात्र सीसीटीव्ही सारख्या तंत्रज्ञानाचा वापर फक्त यासाठीच व्हावा हे अयोग्य आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या राज्य सरकारने सीसीटीव्ही बसवण्याचे नियम तयार केले आहेत. महिलांनी मागणी केलेल्या ठिकाणीच ते प्रामुख्याने बसवले जातात. त्यामुळे तिथे महिलांची छेडछाड करण्याचे, गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रमाण एकदम कमी झाले आहे. पुणे पोलिसांनाही असेच काही करावे, अशी मागणी पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे करणार असल्याची माहिती किर्दत यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post