राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावर निषेध नोंदवला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमी निमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या वेळी ते बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामीं शिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली असून पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
या संदर्भात प्रशांत जगताप यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,'अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (२८ फेब्रुवारी २०२२) सकाळी १०.३० वाजता पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात येईल.’
दरम्यान, चाणाक्या शिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते.’ तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल म्हणाले होते.