फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब



प्रेस मीडिया ऑनलाइन :

अनवरअली शेख :

 पुणे - गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, हा संभ्रम आता दूर झाला आहे. सोमवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.


विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी नियुक्‍त केलेल्या समितीने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन आणि अन्य वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची शिफारस केली होती. मात्र, करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे महाविद्यालये बंद करावी लागल्यानंतर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्या परिषदेत घेण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा ऑफलाइन परीक्षांची चर्चा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परीक्षांबाबत आज चर्चा झाली. विद्या परिषदेने ऑनलाइन परीक्षांना मान्यता दिली आहे. आता, ऐनवेळी त्यात बदल करून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घ्यायच्या झाल्यास तयारीसाठी आणखी एक ते दीड महिना लागू शकतो. त्यामुळे सध्या ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेणे योग्य ठरणार नसल्याने ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षा घेण्यावर बैठकीत एकमत झाले.

विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. करोनामुळे एक तर शैक्षणिक सत्र लांबणीवर पडले आहे. त्यात आणखी ही परीक्षा ऑफलाइन घेतली तर आणखी दोन महिने परीक्षा पुढे ढकलावी लागतील. लवकर परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत असताना ऑनलाइन हाच पर्याय सध्या योग्य राहणार असल्याचे बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर ऑनलाइन परीक्षांवर अंतिम निर्णय झाल्याने हा गोंधळ संपुष्टात आला आहे.

ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याच्या तयारीसाठी एक ते दीड महिना आवश्‍यक आहे. त्यात परीक्षा आधीच लांबलेल्या आहेत. ही बाब विचारात घेऊन परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील. त्यादृष्टीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सर्व तयारी केली आहे.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग

Post a Comment

Previous Post Next Post