२३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा मोठा फटका हवेली तालुक्याला , तर तालुक्यातील तब्बल ७ गट आणि १४ गणांवर संक्रांत .
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी (मुन्ना) शेख :
पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकांसाठी नव्याने गट आणि गण निश्चिती करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा परिषदेसाठी ८२ आणि पंचायत समित्यांसाठी १६४ गण निश्चित करण्यात आले आहेत.त्यामुळे जिल्हा परिषदेचे नवीन ७ गट आणि पंचायत समित्यांचे नवीन १४ गण वाढले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने हे गट आणि गण निश्चित करण्यात आले आहेत.
मात्र आता नव्याने झालेल्या या गट आणि गण पुनर्रचनेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात कमालीचा बदल होणार हे नक्की आहे. कारण हवेली तालुक्याचे सर्वात मोठा तालुका हे जिल्ह्यातील वर्चस्व मोडीत निघाले आहे. २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा मोठा फटका हवेली तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील तब्बल ७ गट आणि १४ गणांवर संक्रांत आली आहे. नवीन रचनेत हवेली तालुक्यात आता केवळ ६ गट आणि १२ गण निश्चित झाले आहेत.
या नवीन रचनेत आंबेगाव आणि वेल्हे या दोन तालुक्यातील पूर्वीचीच गट आणि गणांची संख्या कायम राहिली आहे. तर दुसऱ्या बाजूला या नव्या गट रचनेचा १० तालुक्यांना फायदा झाला आहे. यात जुन्नर, खेड, दौंड आणि इंदापूर या ४ तालुक्यांमधील प्रत्येकी २ गट आणि ४ गण वाढले आहेत. तर शिरूर, मावळ, मुळशी, पुरंदर, भोर आणि बारामती या ६ तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ गट आणि २ गण नव्याने निर्माण झाले आहेत.
या पुर्वी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याने जिल्ह्यातील गट आणि गणांची संख्या कमी होणार असल्याचे निश्चित झाले होते. यानुसार जुन्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या ७५ गटांची संख्या २ ने कमी होऊन तीन ७३ तर, गणांची संख्या १४६ झाली होती. मात्र गत वर्षी सरकारने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या गट आणि गणांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. या नव्या रचनेत गट आणि गणांची संख्या वाढविण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यामुळे या नव्या रचनेनुसार पूर्वी पुणे जिल्ह्यात ८३ गट आणि १६६ गण निश्चित करण्यात आले होते. परंतु ही संख्या अंतिम करताना त्यात परत अनुक्रमे एक गट आणि दोन गणांनी संख्या कमी झाले आहेत.
दरम्यान, आता पर्यंत हवेली तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक गट आणि गणांची संख्या राहत असे. यानुसार २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत हवेली तालुक्यात १० गट आणि २० गण होते. त्यानंतर पाच वर्षांनी झालेल्या २०१७ च्या निवडणुकीत हीच संख्या अनुक्रमे १३ आणि २६ झाली होती. परंतु आता यात अनुक्रमे ७ आणि १४ ने घट झाली आहे. हवेलीमध्ये आता ६ गट आणि १२ गण निश्चित झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक मोठा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हवेलीची ओळख संपुष्टात आली आहे. वेल्हे तालुक्याने मात्र सर्वात लहान तालुक्याची असलेली ओळख कायम राखली आहे.