प्रेस मीडिया ऑनलाइन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
गजानन चिंचवडे यांचा 5 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. त्यांचा मृत्यू ही आत्महत्या नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
भाजपाचे चिंचवडगाव मधील नेते गजानन चिंचवडे यांचा शनिवारी (दि. 5) दुपारी एक वाजताच्या पूर्वी मृत्यू झाला. गजानन चिंचवडे यांच्या विरोधात 25 जानेवारी रोजी फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल केला. तसेच त्यांना मानसिक त्रास दिला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हणत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर आरोप केले. पालिकेतील भाजप पदाधिका-यांवर विविध प्रकरणात गुन्हे दाखल होत आहेत. स्थायी समिती अध्यक्षा नितीन लांडगे, नगरसेवक राजेंद्र लांडगे, माजी उपमहापौर केशव घोळवे, पदाधिकारी गजानन चिंचवड यांच्या प्रकरणातील पोलिसांची कारवाई पाहिल्यावर पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.चंद्रकांत पाटील यांनी आमदार लक्ष्मण जगताप, सदाशिव खाडे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, अमोल थोरात, बाबू नायर यांच्यासह पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेतली. गजानन चिंचवड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरण दिवाणी असताना ते फौजदारी कसे केले, याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, 'गजानन चिंचवडे यांचा पीएम रिपोर्ट यायचा आहे. पण त्यांच्या हृदयात 70 टक्के ब्लॉकेजेस असल्याने त्यांचा मृत्यू हृदयविकारानेच झाला असल्याचे स्पष्ट आहे. ही आत्महत्या वैगेरे नाही. त्यांच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात दिवाणी दावा फौजदारी कसा केला याची माहिती घेत आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.'