पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी बदलाचे वारे जोरात वाहू लागले

 पिंपरी चिंचवड मधील राजकिय वातावरण तापू लागले.


प्रेस मीडिया ऑनलाइन : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :

पिंपरी चिंचवड  :  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना शहर राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी बदलाचे वारे जोरात वाहू लागले आहे. शनिवारी (दि. 5 रोजी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर अंतिम निर्णय झाला असून, अजित गव्हाणे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय महिला शहराध्यक्ष म्हणून कविता आल्हाट यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. युवक शहराध्यक्षपदाची जबाबदारी इम्रान शेख किंवा निहाल पानसरे यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे विश्‍वसनिय सूत्रांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. महापालिकेच्या दृष्टीकोनातून शहरातील विभागवार जबाबदारी देतानाच भोसरीतून अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांमध्ये समतोल राखण्यात आल्याचे सांगण्यात आले. भोसरी विधानसभेकडे शहराध्यक्षपदाचा मान देण्यात आला असून, अजित गव्हाणे यांचे नाव सर्वसंमतीने निश्‍चित करण्यात आल्याचे समोर आले आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या संघटना बांधणीमध्ये अग्रणी भूमिका घेतलेल्या कविता आल्हाट यांच्याकडे महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ अध्यक्षपदी असलेल्या संजोग वाघेरे यांची महामंडळाच्या पदाधिकारीपदी निवड करण्याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. युवक शहराध्यक्ष म्हणून इम्रान शेख किंवा निहाल पानसरे यांच्यापैकी एकाकडे जबाबदारी देण्यात येणार आहे. पदाधिकाऱ्यांची नावे अंतिम करताना भौगोलिक समतोल राखतानाच जातींचेही समीकरण जुळविण्याकडे राष्ट्रवादीने लक्ष दिल्याचे समोर आलेल्या नावांवरून स्पष्ट झाले आहे. तीन विधानसभा मतदारसंघांसाठी तीन स्वतंत्र कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात येणार असून, त्यांच्या नावांवर अंतिम सहमती सुरू आहे. या नावांची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने या निवडी करण्यात येणार असल्या तरी भाजपाला टक्कर देण्याच्या दृष्टीकोनातून निवडणुकीसाठी स्वतंत्र टीम तयार करून त्याचे कोणाकडे नेतृत्त्व दिले जाणार याकडे आता लक्ष लागले आहे. योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, आण्णा बनसोडे व विलास लांडे यांच्या नावांवर चर्चा सुरू असून, निवडणूक समिती प्रमुख, निवडणूक समन्वयक, प्रचार प्रमुख व मुख्य प्रवक्ता या पदांवर वरिष्ठ नेत्यांना संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नव्या पदाधिकाऱ्यांची नावे अंतिम करून लवकरच ती जाहीर केली जाणार असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या नियुक्त असलेले पदाधिकारी व नव्याने नियुक्त होणाऱ्या पदाधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्र्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत वरील नावे अंतिम करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्याची घोषणा मुंबईतून केली जाण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही दिवसांवर आली असून निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने काम करायचे याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी शहरातील सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. आगामी काळात कोणत्या कमिट्या तयार करायच्या. जाहीरनामा कसा असेल यावर चर्चा झाली. मात्र, पदाधिकारी बदलाबाबत बैठकीत काहीच चर्चा झाली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शहर पातळीवर याबाबत चर्चा आहे. मात्र बैठकीत काही ही चर्चा झालेली नाही. तसेच कोणाचेही नाव निश्‍चित केले नाही, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी बदलच्या चर्चे बाबत बोलताना दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही दिवसांवर आल्याने या निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होती. या बैठकीमध्ये निवडणुकीच्या दृष्टीने सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्याबाबतही योग्य ती चर्चा झाली. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा झालेली असली तरी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची पक्षश्रेष्ठींनी अद्याप घोषणा केलेली नाही. भविष्यात पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नगरसेवक अजित गव्हाणे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post