प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवरअली शेख :
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेचे सन 2022-23 चे अंदाजपत्रक आज (दि. 18) स्थायी समितीसमोर सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे या महत्त्वाच्या दिवशी आयुक्त रजेवर असल्याने अंदाजपत्रक त्यांच्या अनुपस्थितीत सादर केले जाणार आहे.सत्ताधारी भाजपचे सन 2022-23 चे हे पाचवे अंदाजपत्रक आहे. तर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे दुसरे अंदाजपत्रक आहे. मात्र मागील वर्षी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तयार केलेले अंदाजपत्रक आयुक्त पाटील यांनी सादर केले होते.
त्यामुळे पाटील यांनी तयार केलेले हे त्यांचे पहिलेच अंदाजपत्रक आहे. आतापर्यंत कधीही आयुक्तांच्या अनुपस्थितीत अंदाजपत्रक सादर झाले नाही. अंदाजपत्रक सादर होण्याच्या दिवशी आयुक्त आर्वजून उपस्थित असतात. आधी अंदापत्रक सादर करण्याची तारीख 22 फेब्रुवारी ठरली होती. त्यानंतर त्यात बदल करुन ती तारीख 18 फेब्रुवारी करण्यात आली. तरीही अंदाजपत्रक सादर करण्यासाठी आयुक्त उपस्थित राहणार नसल्याने चर्चा रंगली आहे.
अंदाजपत्रक सादर करण्यासाठी शुक्रवारी (दि. 18) सकाळी साडेदहा वाजता विशेष स्थायी समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त राजेश पाटील अनुपस्थित राहणार असल्याने या सभेत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना अंदाजपत्रक सादर करणार आहेत.
दरम्यान, मागीलवर्षी मूळ 5 हजार 588 कोटी 78 लाख तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 112 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा किती कोटींचे अंदाजपत्रक असेल. त्यामध्ये वाढ होणार की घट होणार, निवडणुकीपूर्वी शहरवासीयांना नवीन काय मिळणार याबाबत उत्स्कुता आहे. करोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असून उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच निवडणूक तोंडावर असल्याने अंदजापत्रकातून नवीन घोषणा केल्या जातात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उत्पन्न कमी आणि खर्च जास्त!
1 एप्रिल 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत जीएसटीचे 1686 कोटी 56 लाख, मालमत्ता करापोटी 302 कोटी 97 लाख, लेखा विभागातून 62 कोटी 8 लाख, बांधकाम परवानगीतून 775 कोटी 22 लाख, भांडवली जमा 12 कोटी 23 लाख, पाणीपुरवठा विभागातून 54 कोटी 16 लाख आणि इतर विभागातून 92 कोटी 83 लाख असे 2 हजार 986 कोटी 7 लाख रुपये महापालिका तिजोरीत जमा झाले आहेत. तर, महसुली आणि भांडवली कामावर 3 हजार 194 कोटी रुपये खर्च झाला आहे. महापालिकेला चालू आर्थिक वर्षातील दहा महिन्यात 2 हजार 986 कोटी 7 लाख रुपये उत्पन्न मिळाले. तर, 3 हजार 194 कोटी रुपये खर्च झाला आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला आहे.
आयुक्त त्यांच्या वैयक्तिक कारणाने रजेवर आहेत. त्यामुळे स्थायी समितीला अंदाजपत्रकाचे सादरीकरण मी करणार आहे.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पिं.चिं. महापालिका