प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता प्रभाग रचनेच्या अनुषंगाने विधानसभा मतदार याद्यांचे प्रभाग निहाय विभाजन करण्यात येणार आहे.शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारयाद्यांचे विभाजन करण्यासाठी सहा सहायक अधिकारी, 46 पर्यवेक्षक आणि 225 प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कामकाज 24 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसंदर्भात आदेश जारी केले आहेत. प्रभाग रचनेच्या अनुषंगाने मतदार याद्यांचे प्रभाग निहाय विभाजन करावे लागणार आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून विधानसभा मतदार याद्या कोणत्या प्रभागात जातात, तसेच ज्या मतदार याद्या दोन प्रभागामध्ये विभाजन होत आहेत. त्यांची प्रत्येक मतदारनिहाय स्थळ पाहणी करून गोषवारा सादर करावा लागणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी ब आणि ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अनुक्रमे अभिजीत हराळे आणि विजयकुमार थोरात यांची सहायक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, 18 पर्यवेक्षक आणि 88 प्रगणक यांची नेमणूक करण्यात आली आहे. या मतदारसंघात 1 ते 491 पर्यंतचे यादी भाग क्रमांक आहेत. या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत भोर विधानसभा मतदारसंघातील 27 ते 32 पर्यंतच्या यादी भाग क्रमांकाचाही समावेश आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी ड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त उमाकांत गायकवाड आणि ग क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त रविकिरण घोडके यांची सहायक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, 14 पर्यवेक्षक आणि 70 प्रगणक यांची नेमणूक करण्यात आली आहे. या मतदारसंघात 1 ते 418 पर्यंतचे यादी भाग क्रमांक आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर आणि अ क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त शीतल वाकडे यांची सहायक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, 14 पर्यवेक्षक आणि 67 प्रगणक यांची नेमणूक करण्यात आली आहे. या मतदारसंघात 1 ते 399 पर्यंतचे यादी भाग क्रमांक आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत चार विधानसभा मतदार क्षेत्राचा भाग येतो. चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभा हे पूर्ण मतदारसंघ शहरात आहेत. याशिवाय भोर विधानसभा मतदारसंघाचा काही भागही महापालिका हद्दीत समाविष्ट आहे. या चार मतदारसंघनिहाय पर्यवेक्षक, प्रगणक यांच्या नेमणूक करण्यात आल्या आहेत.