महाराष्ट्राची लोकधारा' या विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कलादर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सर्व ठिकाणी उत्साहात साजरी केली जात आहे. देहुतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती व मराठी राजभाषा दिन निमित्त, 'महाराष्ट्राची लोकधारा' या विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कलादर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध लोककला व या लोककलांमधून मराठी भाषेची वेगवेगळी रुपे दाखविण्याचा प्रयत्न केला. यावेळी भूपाळी, जात्यावरील ओव्या, वासुदेव, कृषिनिष्ठ शेतकरी, गोंधळ या लोककलांवर नृत्य सादर केले गेले. तसेच एकनाथी भारूड 'विंचू चावला' ने उपस्थित पालकांची मने जिंकली. पाळणागीत गाऊन छत्रपती शिवरायांचे पाळण्यात घालून नामकरण करण्यात आले. इयत्ता तिसरीतील अथर्व फटांगडे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या महतीचा पोवाडा व शिवगर्जनेस टाळ्यांचा कडकडाट करत उपस्थित पालकांनी विशेष दाद दिली.महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, ही संतपरंपरा, समाजसुधारक, साहित्यिक या सर्वांची दिंडी काढून 'मी मराठी' चा जागर करण्यात आला.
जगद्गुरू संत तुकारामांच्या 'विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म' या अभंगावर कीर्तन उभे केले. हे विश्वची माझे घर ही शिकवण यातून देण्यात आली. जगद्गुरू तुकोबाराय हे भक्तीचे प्रतीक… तर छत्रपती शिवराय हे शक्तीचे प्रतिक. तिसरीतील विद्यार्थ्यांनी भक्ती-शक्ती भेट सोहळा सादर केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.शाळेतील शिक्षकवृंदांनी नाशिक ढोलच्या तालावर लेझीम सादर केले. या कार्यक्रमास पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी केले. प्रियंका चव्हाण यांनी आभार मानले.