पिंपरी-चिंचवड मनपाच्या आगामी निवडणुकीसाठी


प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर हरकतींचा वादळी पाऊसच पडला आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

अनवरअली शेख : 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर हरकतींचा  वादळी पाऊसच पडला आहे. 1 ते 14 फेब्रुवारी या मुदतीत 5 हजार 664 हरकती आल्या आहेत.प्रभाग क्रमांक 5 च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी आणि प्रभाग क्रमांक 8 भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग या दोन प्रभागावर सर्वाधिक हरकती आल्या आहेत. व्याप्तीबाबतच्या सर्वाधिक हरकती असून विद्यमान नगरसेवकांनीही हरकती घेतल्या आहेत. महापालिका इतिहासातील या वळेच्या प्रभाग रचनेवरील सर्वाधिक हरकती आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना 1 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली. 139 नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे 45 तर चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रभाग क्रमांक पाच च-होली सर्वांत मोठा तर प्रभाग क्रमांक सात सॅण्डविक कॉलनी, रामनगर सर्वांत छोटा प्रभाग असणार आहे. महापालिका प्रशासनाने 1 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेवर हरकती मागविल्या आहेत. पहिल्या आठवड्यात हरकतींचे प्रमाण कमी होते. मागील आठवड्यात आणि आज शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस पडला.प्रभाग क्रमांक 5 व 8 या दोन प्रभागांवर सर्वाधिक हरकती आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, काळजेवस्ती, पठारेमळा, बुर्डेवस्ती व ताजणेमळा या भागाचा समावेश आहे. हा प्रभाग नैसर्गिकरित्या झाला नाही. यामधील गजाननगर, भारतनगर, गणेशनगर, आदर्शनगर, भारतमातानगर, कृष्णानगर हा भाग प्रभाग क्रमांक सात किंवा आठला जोडण्याची मागणी केली. यासाठी 700 हरकती आल्या आहे. मात्र हे अर्ज अवघ्या दोन व्यक्तींनी आणून दिले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

तर, प्रभाग क्रमांक आठ साठी देखील मोठ्या प्रमाणावर हरकती आल्या आहेत. यामध्ये भोसरी गावठाण, गवळीनगर, खंडोबामाळ व शितलबाग आदींचा समावेश आहे. त्यातील गव्हाणे वस्ती भाग अखंड ठेवावा अशी मागणी केली आहे. यासाठी दोनशेहून अधिक अर्ज आले आहेत. याव्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 3 (जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक 11(गवळीमाथा, बालाजीनगर), 14 (यमुनानगर, फुलेनगर), 17 (वल्लभनगर, संततुकारामनगर), 20 (काळभोरनगर, अजंठानगर), 36 (डांगे चौक, गणेशनगर), 37 (ताथवडे, पुनावळे), 41 (पिंपळे गुरव गावठाण) आणि 42 (कासारवाडी, फुगेवाडी) या प्रभागांवर हरकती आल्या आहेत.

रेल्वेमार्ग, रस्ते, नाले ओलांडून, एकसंध भाग तोडल्याबाबतचे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. प्रारुप आराखड्यावर हरकती घेण्यासाठी आज (सोमवार) अंतिम मुदत होती. आजही मोठ्या प्रमाणावर हरकती आल्या आहेत. आज शेवटच्या दिवसापर्यंत हरकतीची संख्या 5 हजार 664 झाली आहे. या हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कवडे 25 फेब्रुवारी रोजी हरकतींवर सुनावणी घेणार आहेत. 2 मार्च 2022 रोजी प्राधिकृत अधिका-यांच्या शिफारशीसह हा आराखडा निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर 5 मार्च पर्यंत अंतिम आराखडा प्रसिद्ध होईल.

'हद्दी, वर्णन, नावे, आरक्षण अशा हरकतींचे वर्गीकरण केले जाईल. पुढील दोन दिवसात वर्गीकरणाचे काम पूर्ण केले जाईल. या हरकती राज्य निवडणूक आयोगाला पाठविल्या जातील. आयोगाकडून या हरकती प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांना पाठविल्या जातील. एकाच प्रकारची मागणी असलेल्या हरकतींचा एक गठ्ठा केला जाईल. त्या सर्वांना एकाचवेळी सुनावणीसाठी बोलविले जाईल. सुनावणीवेळी आयोगाचाही एक सदस्य उपस्थित असेल. हरकतींबाबतचा अंतिम निर्णय कवडे यांचा राहील', असे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post