सत्तारूढ भाजप आणि पूर्वाश्रमीचे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच निवडणुकीचा मुख्य सामना.. जोरदार चर्चा.

 पिंपरी-चिंचवड शहरातील  राजकारण निवडणुकी मुळे तापू लागले...

प्रेस मीडिया ऑनलाईन

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर होताच पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारण तापू लागले आहे. पालिका आम्हीच जिंकू आणि महापौर आमच्याच पक्षाचा होईल, असा दावा दोन्हीकडून करण्यात आला आहे.सत्तारूढ भाजप आणि पूर्वाश्रमीचे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच निवडणुकीचा मुख्य सामना होईल, असे प्राथमिक चित्र आहे. 

मंगळवारी प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर लगेचच त्याचा प्रत्यय आला आहे. राज्यातील सत्तेचा गैरवापर करून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने पिंपरीतील प्रभागांचे लचकेतोड केल्याचा आरोप भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राष्ट्रवादीने काहीही राजकारण केले तरी, भाजपला फरक फडणार नाही. पाच वर्षांत भाजपने शहराचा कायापालट केला असून शहरवासियांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका भाजप पुन्हा जिंकणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अब की बार, १०० पार ची घोषणा प्रत्यक्षात उतरवून दाखवू, असा दावा ढाके यांनी केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. प्रभागरचना राष्ट्रवादीला अनुकूल असल्याने आमची सत्ता येईल आणि महापौरही आमचा होईल, असा दावा त्यांनी केला. पिंपरी पालिकेत भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. भाजपच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळाली असून त्यांना बदल हवा आहे. निवडणुकीचे राजकारण डोळय़ासमोर ठेवून भाजपने भूमीपूजन आणि कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्याचा सपाटा लावला आहे. भाजपने काहीही केले तरी पालिकेत खांदेपालट होणारच आहे, असा युक्तीवाद राष्ट्रवादीने केला आहे.

नव्या रचनेनुसार पिंपरी पालिकेचे १३९ नगरसेवक होणार आहेत. सत्ताप्राप्तीसाठी बहुमताचा जादुई आकडा ७० आहे. भाजपची २०१७ ची सदस्यसंख्या ७७ तर राष्ट्रवादीची ३६ होती. भाजपला पालिकेतील सत्ता राखायची असून राष्ट्रवादीला पुन्हा मिळवायची आहे. त्यामुळे दोन्हीही पक्षात तीव्र सत्तासंघर्ष सुरू आहे. काही दिवसांपासून त्यांच्यात श्रेयवाद आणि कुरघोडीचे राजकारण पेटले आहे. कोणत्याही विषयाचे निमित्त होऊन दोन्हीकडील नेते आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सोडत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post