कॉंग्रसने सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला


प्रेस मीडिया ऑनलाइन :

अनवरअली शेख :

 पिंपरी - एकेकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रसने सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. शहराध्यक्षपदी कैलास कदम यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर कॉंग्रेसमध्ये नवा उत्साह संचारला असला तरी 139 उमेदवार देताना कॉंग्रेसची दमछाक होण्याची शक्‍यता आहेमहापालिकेतून हद्दपार झालेल्या कॉंग्रेसचा चंचूप्रवेश घडवून आणण्यासाठी कदम हे स्वबळावरच लढणार की आयत्यावेळी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. राज्याची सत्ता एकत्र उपभोगणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महापालिकेसाठी सूत जुळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी कॉंग्रेसने स्वबळाचा नारा देऊन तयारी चालविली आहे. एकेकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर कॉंग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्मितीनंतर या पक्षाला घरघर लागली. त्यातच सत्ता मिळवून देणारा नेता म्हणून ओळख असणाऱ्या प्रा. रामकृष्ण मोरे यांचे निधन झाल्याने कॉंग्रेस अधिकच कुमकुवत झाली. त्यातच राज्यपातळीवरील नेत्यांनीही कॉंग्रेसकडे केलेले दुर्लक्ष, अंतर्गत कलह आणि सातत्याने कमी होत जाणारा जनाधार यामुळे हा पक्ष अधिकच लोप पावत गेला. सन 2017 पर्यंत महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजाविणाऱ्या या पक्षाला 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भोपळ्यावर थांबावे लागले.

त्यामुळे महापालिकेतून कॉंग्रेस हद्दपार झाली. त्यातच गेल्या चार ते साडेचार वर्षांत कॉंग्रेसच्या वाढीसाठी कोणतेच निर्णय न झाल्याने या महापालिका निवडणुकीतही हा पक्ष प्रवाहाबाहेरचा समजला जाऊ लागला होता. मात्र, अचानकपणे कामगार नेते कैलास कदम यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर या पक्षामध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण होऊ लागले आहे. मरगळ आलेल्या पक्षसंघटनेमध्ये अनेक बदल करत कदम यांनी आंदोलने, कार्यकर्ता नोंदणी, महापालिकेती भाजपचा भ्रष्ट कारभार यावर लक्ष केंद्रित केल्याने शहरात अनेक वर्षांनंतर कॉंग्रेस आक्रमक भूमिकेत दिसत आहे. तसेच पक्षापासून दूरावलेला कार्यकर्ता पुन्हा पक्षाकडे आकर्षिला गेल्याचे दिसून येत आहे.

शहर पातळीवरील पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यात कैलास कदम यशस्वी झाले असले तरी संपूर्ण शहरभर संघटना उभी करण्यास त्यांना बराच वेळ लागण्याची शक्‍यता आहे. महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर आल्यामुळे त्यांच्यापुढे संपूर्ण शहरभर कॉंग्रेसचे विजयी होणारे उमेदवार देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. घटनेला जनाधार, कॉंग्रेसबाबत सर्वसामान्यांमध्ये असलेली अनास्था तसेच आर्थिक पाठबळ या बाबी स्वबळाच्या नाऱ्याला छेद देणाऱ्या ठरू शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post