प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवरअली शेख :
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या गेल्या पाच वर्षातील भ्रष्ट कारभारा विरुद्ध विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जास्तच आक्रमक झाली आहे त्यांनी पालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभाविरोधात शुक्रवारी (ता.18 फेब्रुवारी) भाजप चले जाव म्हणत मोठा मोर्चा पालिकेवर काढला. आतापर्यंत गटातटात विखुरलेली राष्ट्रवादी प्रथमच एकजूट झाल्याची यावेळी पहायला मिळाली. यावेळी त्यांच्या सर्वच नेत्यांची भाजपवर हल्लाबोल केला.
भाजपाच्या भ्रष्ट कारभाराला पिंपरी चिंचवडकर वैतागले आहेत. सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचार करीत त्यांनी गरिबांच्या खिशावर डल्ला मारला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत त्यांची सत्ता उलथवून टाकू या, असे आवाहन भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी यावेळी केले. हा मोर्चा म्हणजे भ्रष्टाचारावर हल्लाबोल आहे. महापालिकेतील भ्रष्ट सत्ता घालवून त्याजागी राष्ट्रवादीची सत्ता आणायची आहे. कारण भाजपाने इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पात घोटाळा केला, स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरले, कचऱ्याच्या प्रकल्पात घरातील लोकांना स्वतःच्या बगलबच्चाना ठेका देऊन पैसे लाटले, चुकीचा वाढीव खर्च दाखवून निवडणुकीचा फ़ंड गोळा केला, विद्यार्थ्यांच्या गुडफिल किटमध्ये देखील पैसे खाल्ले अशा एक ना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. म्हणून या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना महापालिकेतून पायउतार करायचे आहे, असे ते म्हणाले.
शहरातील राष्ट्रवादी झाडून या मोर्च्यात एकजुटीने सामील झाल्याची दिसली. नुकतेच पायउतार झालेले शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर यांच्यासह मुख्य प्रवक्ते व माजी महापौर योगेश बहल, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष राहुल भोसले, प्रशांत शितोळे, जगदिश शेट्टी, नवे युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, नगरसेवक विराज लांडे, सुलक्षणा शिलवंत-धर, डॉ.वैशाली घोडेकर आदींसह शेकडो कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी झाले होते.
भ्रष्ट भाजप चले जाव, भ्रष्टाचारी भाजपचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.पाच वर्षात भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. फक्त भ्रष्टाचारच केला, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली. त्यासाठी त्यांच्या दोन आमदारांनी भारत, पाकिस्तान सारखी पालिका वाटूनच घेतली आहे. त्यामुळे त्यांना आता घरी पाठवायची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. त्यांचे स्थायी समिती अध्यक्ष तथा सभापतींना भ्रष्टाचारात (लाचखोरी) अटक झाली. त्यांचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर केशव घोळवे हे सुद्धा खंडणी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात नुकतेच पकडले गेले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादीच्या काळातील एक भ्रष्टाचार भाजपला सिद्ध करता आला नाही. मात्र, त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराची शेकडो उदाहरणे देता येतील, असा हल्लाबोल पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केला.