भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन.

मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेस मीडिया ऑनलाइन :

मुंबई  : देशाचा आवाज, भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्यांनी आज सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. प्रचंड शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून यावेळी लतादीदींना पुष्पचक्र अर्पन करण्यात आलं. त्यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार सुनील प्रभू आदींनी देखील लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.


लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. लतादीदी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वत: शिवाजी पार्कात उपस्थित राहून लतादीदींना अखेरचा निरोप दिला.

नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनस अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता शाहरुख खान, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, सिनेदिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्यासह अनेक दिग्गज आज अंत्यविधीसाठी शिवाजी पार्कात उपस्थित होते.लतादीदींच्या अंत्यविधीला हजारोंचा जनसागर लोटला होता

लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अगदी काही दिवसांपूर्वी त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी बातमी आली होती.

त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढला होता. पण शनिवारी (5 फेब्रुवारी) त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. डॉ. प्रतीत सामदानी यांची टीम त्यांच्यावर ICU मध्ये उपचार करत होती.

(तो क्षण, ज्यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु लतादीदींच्या आवाजाने अक्षरश: रडलेले) अगदी सामान्य परिस्थितीतून अपार मेहनतीने त्यांनी कष्ट करून आघाडीची पार्श्वगायिका म्हणून स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत अनभिषिक्त गानसम्राज्ञी म्हणून नाव कमावलं. सर्व प्रकारची गाणी लतादीदी गायल्या आहेत. भावोत्कट स्वर, प्रसंगानुरूपच नव्हे तर पडद्यावर ज्या नायिकेसाठी आपला आवाज असणार आहे त्या भूमिकेनुसार लता मंगेशकरांनी पार्श्वगायनातले बारकावे टिपले.

सुस्पष्ट शब्दोच्चार आणि अलौकिक आवाज या जोरावर त्यांनी हे अढळ स्थान प्राप्त केलं. पण इथपर्यंत पोहोचण्याचा आणि ते स्थान शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रवास सहजसाध्य नव्हता. 28 सप्टेंबर 1929 रोजी तत्कालीन इंदोर संस्थानात जन्म झालेल्या लतादीदी मंगेशकरांच्या घरातलं थोरलं अपत्य. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं या आपल्या थोरल्या लेकीवर जीवापाड प्रेम.

तिच्यातली गानप्रतिभाही त्यांनी खूप लहानपणीच हेरली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून लतादीदी अगदी लहानपणापासून आपसूकच ऐकून ऐकून ताना घेत असत. त्यानंतर त्यांनी रीतसर गाण्याचं शिक्षण घेतलं आणि लहानपणीच संगीत नाटकातून पं. दीनानाथ मंगेशकरांची ही लेक व्यासपीठावर वावरू लागली.

Post a Comment

Previous Post Next Post