तोतया पत्रकाराने सात तरूणांची साडेचार लाखांची फसवणूक केली

 


प्रेस मीडिया ऑनलाइन :

लोणी काळभोर : तोतया पत्रकाराने सात तरूणांना शासकीय नोकरीस लावतो असे आमिष दाखवून साडेचार लाखांची फसवणूक केली असल्याचा प्रकार कुंजीरवाडी (ता.हवेली ) येथे घडला आहे. संजय पांडूरंग कदम (रा. धानकल, कदमवाडी, ता. पाटण, जि. सातारा) हे फसवणूक करून फरार झालेल्या बोगस पत्रकाराचे नाव आहे. त्याने ४ महिन्यांपूर्वी नायगांव चौक म्हस्के कॉम्लेक्स, कुंजीरवाडी येथे आपण न्यूज २४ तास मराठी या वृत्तवाहिनीचे पत्रकार आहोत अशी बतावणी करून ऑफिस थाटले होते.

तेथे त्याने ७ युवकांना १२ ते १५ हजार रुपये वेतन देतो असे सांगून कामास ठेवले होते. सदर तरूण बातम्या तयार करून त्याचेकडे द्यायचे. त्या बातम्या कोठेही प्रसिद्ध होत नाहीत हे पाहून एकाने विचारणा केली असता कदम याने आपण येथे स्टुडिओ उभारणार असून त्यानंतर सर्व बातम्या प्रसिद्ध करू अशी थाप मारली होती. दरम्यानच्या काळात त्याचेकडे काम करत असलेल्या तरुणांना विश्वासात घेऊन त्याने पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांशी ओळख असून प्रत्येकी दोन लाख रुपये दिले तर तुम्हाला महानगरपालिकेत शासकीय नोकरी मिळवून देतो असे सांगितले.

सदर बाब तुम्ही तुमच्या नातेवाईकांनाही कळवा असे सांगितले. नोकरी मिळेल या अपेक्षेने १२ ते १५ जणांनी त्याला २५ हजारांच्या पुढे जमेल रक्कम दिली. त्यातील एकाने तर १ लाख ७० हजार रुपये असे एकूण ४ लाख ३० हजार रुपये दिले. यानंतर ७ कामगारांनी त्याला पगार मागितला असता ११ ऑक्टोबर रोजी देतो असे सांगून सर्वांना गप्प बसवले. १२ ऑक्टोबर रोजी सर्वजण कामाला आले त्यावेळी ऑफिस बंद असल्याचे पाहून सर्वजण त्याच्या घरी गेले असता तेथेही कुलूप लावलेले दिसले म्हणून त्यांनी मोबाईल वरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता.

घर व ऑफिस मालकानी त्यांना चार महिन्यांचे भाडे दिले नसल्याने सांगितले. तसेच हॉटेलमध्ये चहा, नाष्टा, जेवणाची उधारी दिली नसल्याचे समजले. तसेच त्याने ओळख झालेली अनेकांना असेच गंडवले असल्याची माहिती पुढे येत आहे. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन या तोतया पत्रकारावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

.

Post a Comment

Previous Post Next Post