या वयात त्याच्यावर आई आणि दोन बहिणींचे कुटुंब सांभाळण्याची वेळ आली...


प्रेस मीडिया ऑनलाइन :

कोल्हापूर: मुरलीधर कांबळे 

कोल्हापूर : त्याचे वय मित्रांसोबत खेळायचे-बागडायचे, शाळा शिकत आपले छंद जोपासायचे… मात्र या वयात त्याच्यावर आई आणि दोन बहिणींचे कुटुंब सांभाळण्याची वेळ आली आहे.इयत्ता आठवीत शिकणार्‍या 14 वर्षीय समर्थने आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देत नियतीने सोपवलेली जबाबदारी आपल्या नावाला साजेशा पद्धतीने म्हणजे 'समर्थ'पणे पेलली आहे.

सहा महिन्यांपूर्वी वडिलांचे अचानक निधन झाल्यामुळे निराधार झालेल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी समर्थची धडपड सुरू आहे. वडिलांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सांभाळणारा समर्थ ऊन-वारा-पावसातही हे काम करत आहे. आईच्या मदतीने तो दररोज सुमारे 250 घरात अंक टाकण्याचे काम करत आहे.

पूर्वी फुलेवाडी येथे राहणारे कुमार बळवंत कुपटे यांनी 1999 पासून वृत्तपत्र वितरणाचे काम सुरू केले. आपल्या रिक्षा व अ‍ॅपे या वाहनांतून कोल्हापूर ते गनबावडा तसेच कोल्हापूर शहरातील उपनगरांत वृत्तपत्र वितरणाचे काम ते करत होते. दोन-तीन वर्षांत व्यवसायात चांगला जम बसल्यानंतर 2003 मध्ये त्यांचे लग्‍न झाले. काही वर्षांनी कुपटे यांच्या आई आजारी पडल्या. आजारपण वाढल्याने त्यांच्यावरील उपचारासाठी सर्व बचत खर्च झाली. यामुळे त्यांना रिक्षा व अ‍ॅपे ही वाहनेही विकावी लागली.

लग्‍नानंतर मुला-बाळांची जबाबदारी असल्याने कुमार कुपटे यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी 2009 मध्ये अंक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. 2011 ला मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालीम परिसरात भाड्याच्या घरात ते आले. तेथे कुपटे यांनी आपला व्यवसाय वाढवला. मात्र, गतवर्षी आजारपणामुळे जुलै 2021 मध्ये कुमार कुपटे यांचे आकस्मित निधन झाले.

पहाटे 5 ते 9 या चार तासांत हे काम पूर्ण झाल्यानंतर समर्थ शाळाही शिकत आहे. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आठवीत तो शिकत आहे. अभ्यासातही तो चांगला असून संस्कृत व कॉम्प्युटर विषयांसह 80 टक्क्यांपर्यंत गुणांची कमाई त्याने केली आहे. भारतीय सैन्य दलात जाऊन देशसेवा करण्याची त्याची इच्छा आहे. समर्थची मोठी बहीण स्नेहा न्यू कॉलेजमध्ये 12 वी सायन्सच्या वर्गात शिकत आहे. तर धाकटी बहीण समृद्धीही प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. दोघी बहिणी घर सांभाळतात तर समर्थ व त्याची आई वृत्तपत्र विक्री व नोकरीतून 10-12 हजार रुपयांची जुळणी करतात. अशा निराधार कुटुंबाला आवश्यकता आहे, समाजाच्या पाठबळाची.

यामुळे कुपटे यांच्या पत्नी सविता यांच्यावर दोन मुली व एक मुलगा यांची जबाबदारी आली. एम.कॉम.पर्यंत शिक्षण झालेल्या सविता कुपटे यांनी मिळेल ती खासगी नोकरी करून मुलांचा सांभाळ सुरू ठेवला. कुटुंबाला आधार म्हणून सर्वात लहान असणार्‍या समर्थनेही स्वत:हून वृत्तपत्र टाकण्यास सुरुवात केली. वडिलांवर उपचार सुरू असल्यापासूनच समर्थने अंक टाकण्याची जबाबदारी स्वीकारली होती.

सध्या समर्थ आईच्या मदतीने दसरा चौक, छत्रपती शिवाजी चौक, बाराईमाम तालीम, दिलबहार, पाटाकडील तालीम, सिद्धाळा बाग या विस्तृत परिसरातील सुमारे 250 घरांमध्ये सायकलवरून वृत्तपत्रे पोहोचवत आहे. समर्थच्या आई सविता कुपटे सकाळी वृत्तपत्र टाकण्यास मदत केल्यानंतर 10 ते 7 या वेळेत खासगी नोकरी करतात.

Post a Comment

Previous Post Next Post