प्रेस मीडिया ऑनलाइन :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : शहरा भोवती असणाऱ्या ग्रामपंचायती आणि उपनगरातील सांडपाणी वेगवेगळ्या नाल्यांमधून महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातच येते. त्याच्यावर येथे प्रक्रिया होते व पुढे ते नदीत सोडले जाते.मात्र, याचे कोणतेही उत्पन्न महापालिकेला मिळत नाही. तसेच या अतिरिक्त सांडपाण्याचा भार महापालिकेच्या प्रकल्पांवरच आहे. या ग्रामपंचायतींनी आपापले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज आहे.
पंचगंगा नदीतील मासे मेल्याने जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. महापालिका क्षेत्रातील काही नाल्यांचे पाणी थेट नदीत जात असल्याचे निदर्शनास आले. महापालिका क्षेत्रात ९६ एम.एल.डी सांडपाणी तयार होते. त्यातील ९२ एम.एल.डी सांडपाण्यावर सध्या प्रक्रिया केली जाते. अतिरिक्त चार एमएलडी पाणी नाल्यांमधून नदीत जाते. सध्या महापालिका जेवढ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करते त्यातील पाच एमएलडी पाणी शहराच्या भोवती असणाऱ्या ग्रामपंचायती, उपनगरातून येते. यातील बहुतांश ग्रामपंचायतींना प्राधिकरणाचा पाणीपुरवठा होतो. त्याचे बिलही प्राधिकरण घेते. मात्र, या पाण्यातून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया मात्र महापालिकेला करावी लागते.
महापालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा अधिभार बिलातून घेतला जातो. मात्र, या ५ एम.एल.डी सांडपाण्याचा अधिभार महापालिकेला मिळत नाही. या ग्रामपंचायतींनी स्वतःचे प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे निश्चित झाले. त्यांना निधीही देण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठ आणि के.आय.टी महाविद्यालय यासाठी तंत्रज्ञान देणार आहे. मात्र वर्ष झाले तरी अद्याप एकही प्रक्रिया प्रकल्प उभारलेला नाही. उपनगरातील लोकसंख्या वर्षागणिक वाढत आहे. त्यामुळे त्यांचे सांडपाणीही वाढत असल्याने महापालिके वरील हा भार वाढत जाणार असून, ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
असे येते सांडपाणी
गाव नाला
मोरेवाडी - रेव्ह्यूनी कॉलनी, एस.एस.सी. बोर्ड, शास्त्रीनगरमार्गे उद्यमनगरमध्ये गोमती नाल्याला मिळतो
आर.के.नगर - राजेंद्रनगर, एस.एस.सी. बोर्ड, आधार हॉस्पिटलमार्गे उद्यमनगरमध्ये गोमती नाल्याला मिळतो
पाचगाव - जरगनगर, रामानंदनगर, यल्लमा मंदिरमार्गे गोमती नाला
उचगाव - येथील नाला वीटभट्टीच्या मागून नदीत मिसळतो
मोरेवाडी, पाचगाव आणि उचगाव येथील सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सुरू असलेले सर्वेक्षणाते काम अंतिम टप्प्यात आले. लवकरच निधी मंजूर होऊन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात होइल.
-प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद