गट आणि गण बदलणार असल्याने विद्यमान इच्छुकांचे धाबे दणाणले

 जिल्हा परिषदेचे अनेक विद्यमान सदस्य ऑक्‍सिजनवर 

कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट आणि गणरचनेतील त्रुटी दूर करून दोन ते तीन दिवसांत पुन्हा प्रारूप आराखडा सादर करावा, अशा सूचना निवडणूक आयोगाने आज दिल्या.महसूल उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी हा अहवाल सादर केला. दरम्यान, गट आणि गण बदलणार असल्याने विद्यमान इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यात २५ जिल्हा परिषद व त्या अंतर्गत २८४ पंचायत समित्यांची प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांना विविध तारखा निश्‍चित करून दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेची मुदत २२ मार्चला संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आराखडा आज सादर करण्यात आला. यात काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. या त्रुटी दूर करून नव्याने आराखडा दिला पाहिजे. नवीन आराखडा देत असताना कोणतीही त्रुटी राहू नये, अशाही सूचना आयोगाने केल्या आहेत. श्री. क्षीरसागर यांनी आज जिल्हा परिषदेच्या नियोजित गटांची व पंचायत समितीच्या गणांची माहिती दिली. लोकसंख्या व विधानसभा मतदारसंघनिहाय गट व गण कसे असतील, याचीही विस्तृत माहिती दिली. सध्या जिल्हा परिषदेचे ६७ गट होणार आहेत; तर पंचायत समितीचे १८ नवीन गण होणार आहेत. ही रचना झाल्यावर त्यावर हरकती मागवूनच आराखडा निश्‍चित केला जाणार आहे. हा आराखडा अंतिम झाल्यावर त्यावर आरक्षण सोडत काढली जाईल.

विद्यमान सदस्य ऑक्‍जिनवर

जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपत आल्यावर अनेक सदस्यांनी आपापल्या गटातील गावांमध्ये विविध विकासकामांचा नारळ फोडला आहे. अनेकांनी सहा महिन्यांपासून विकासकामांचा धडाका लावला. काहींनी कामांचा प्रारंभ करून ठेवला आहे. यातच ज्या गावांत मोठ्या रकमेची विकासकामे होणार आहेत, ती गावेच इतर मतदारसंघात जाणार की काय, या विचाराने जिल्हा परिषदेचे अनेक विद्यमान सदस्य ऑक्‍सिजनवर आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post