कोल्हापूर जिल्ह्यात लागू करण्यात आलेलेे काही निर्बंध शिथिल

       संचारबंदीही मागे घेण्यात आली आहे


प्रेस मीडिया ऑनलाइन : 

कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लागू करण्यात आलेलेे काही निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री 11 ते पहाटे पाच या वेळेत लागू केलेली संचारबंदीही मागे घेण्यात आली आहे.याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी प्रसिद्ध केले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

दि. 9 जानेवारीपासून जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. अत्यावश्यक कारणांशिवाय रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली होती. राज्य शासनाने ज्या जिल्ह्यांत 18 वर्षांवरील 90 टक्क्यांहून अधिक नागरिकांचा पहिला डोस आणि 70 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे दुसर्‍या डोससह लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना निर्बंधांत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी रेखावार यांनी बुधवारी सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यात लागू असलेली रात्रीची संचारबंदी रद्द केल्याचा आदेश काढला. या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात येणार आहेत. आसन क्षमतेच्या 25 टक्के अथवा 200 यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धाही घेता येणार आहेत.

जिल्ह्यातील आठवडी बाजार खुल्या अथवा मोकळ्या जागेत दोन विक्रेत्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवून भरवावेत, यात्रा व जत्रांसाठी केवळ 50 व्यक्‍तींच्या उपस्थितीत पारंपरिक धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बगिचे व उद्याने खुली राहतील. तसेच करमणूक, थीम पार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क, रेस्टॉरंटस्, सिनेमागृहे, नाट्यगृहे त्यांच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

भजन आणि सर्व स्थानिक, सांस्कृतिक आणि लोककला कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने घेता येणार आहेत. लग्‍न समारंभास खुल्या मैदानाच्या व बंदिस्त हॉलच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के अथवा 200 यातील जी संख्या कमी असेल तितक्या व्यक्‍तींना उपस्थित राहता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post