समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. १५ समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस,थोर स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ विचारवंत आचार्य शांताराम गरुड यांनी भारतीय राज्यघटनेची मूल्ये समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रस्थापित करण्यापासून तसेच मताधिकारापासून लोकसत्ताकापर्यंतच्या शब्दांचे अन्वयार्थ पंचेचाळीस वर्षापूर्वी सर्वप्रथम सांगून ते रूढ करण्याचा प्रयत्न केला. आज एकीकडे हे विचार रूढ होत असतांनाच राज्यघटनेच्या तत्वज्ञानाविरोधी वर्तन - व्यवहार - धोरणे यांच्यात वाढ होत आहे.अशा अस्वस्थ वर्तमाना मध्ये शांतारामबापूंचे विचार घेऊन पुढे जाणे अतिशय महत्त्वाचं आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते कालवशआचार्य शांताराम गरुड यांच्या पंच्यांणव्या जन्मदिनी अभिवादन करतांना बोलत होते. यावेळी आचार्य बापूंच्या प्रतिमेला प्रा.सौरभ मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कुलकर्णी म्हणाले, शांतारामबापूंनी पुढाकार घेऊन ज्येष्ठ विचारवंत नेते कालवश डॉ. एन. डी. पाटील , शहीद कॉ.गोविंद पानसरे व अन्य सहकाऱ्यांच्या सहकार्याने समाजवादी प्रबोधिनीची स्थापना केली. शांतारामबापूंनी राजकारण - समाजकारण आणि समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात भारतीय संस्कृतीसह मार्क्सवादापासून गांधीवादापर्यंत आणि लोकशाही समाजवादापासून वैज्ञानिक दृष्टिकोनापर्यंत विविध विषयांचे सैद्धांतिक वैचारिक प्रबोधन करण्याला अग्रक्रम दिला. त्या प्रबोधनकार्यात समविचारी सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवीणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. यावेळी शशांक बावचकर,प्रा. रमेश लवटे ,पांडुरंग पिसे, अन्वर पटेल, शिवाजी शिंदे ,महालिंग कोळेकर, सौदामिनी कुलकर्णी, अश्विनी कोळी, मनोहर जोशी,विशाल जाधव,पुंडलिक कदम आदी उपस्थित होते.