प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
प्रेस मीडिया ऑनलाइन :
अनिल त्र्यंबक अवचट यांचा जन्म पुणे येथे २६ ऑगस्ट १९४४ रोजी झाला.आणि पुण्यातच ते २७ जानेवारी २०२२ रोजी कालवश झाले. बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. झाल्यानंतरही जे वैद्यकीय प्रॅक्टिस न करता समाजकार्याकडे वळले. कारण त्यांचा पिंड अभ्यासू चळवळ्या कार्यकर्त्याचा होता.सामाजिक चळवळीत काम करत असताना आलेल्या अनुभवांच्या आणि वस्तुनिष्ठ निरीक्षणाच्या आधारे त्यांनी साधनेसह विविध नियतकालिकात लेखन केले. वृत्तांतवजा असलेले हे लेखन त्यातील कळकळीमुळे वाचकाला खिळवून ठेवत असे आणि विचारप्रवृत्त करत असे. समाजातील पिचलेल्या वर्गाचे जगणं त्यांनी शब्दबद्ध केले. त्यांचे रिपोर्ताज स्वरूपाचं लेखन हे मराठी साहित्यात प्रथमच येत होतं. त्यातील वास्तवतेमुळे आणि मांडणीच्या नव्या पद्धतीमुळे त्यांचा स्वतःचा असा एक वाचकवर्ग होता. जीवनाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन सामाजिक बांधिलकीचे मूल्य मानणारा होता. समकालीन समाज आणि संस्कृती यांचे नेमके विश्लेषण करून समाजाला दिशा देण्याची ताकद अवचटांच्या लिखाणामध्ये आहे. पूर्णिया, वेध, अंधेर नगरी निपाणी , छेद, हमीद, संभ्रम ,माणसं, धागे आडवे उभे,वाघ्या- मुरळी , कार्यरत,कोंडमारा,गर्द, धार्मिक, जगण्यातील काही, दिसले ते, मस्त मस्त उतार, सृष्टीत गोष्टीत, वनात जनात,मोर ,अमेरिका, स्वतःविषयी,आप्त, छंदाविषयी,लाकूड कोरताना,माझी चित्तरकथा,शिकविले ज्यांनी, प्रश्न आणि प्रश्न ,मुक्तांगणची गोष्ट ,सरल तरल अशा अनेक पुस्तकातून अनिल अवचट नावाचा कार्यकर्ता ,लेखक आणि सर्वोत्तम माणूस आपल्याला भेटत जातो.
अनिल अवचट यांचं जाणं म्हणजे एका बहुआयामी कलावंताच ,दुर्मिळ व्यक्तिमत्त्वाच जाणं आहे.अवचट कोण होते ? म्हणण्यापेक्षा अवचट कोण नव्हते ?याचा विचार करावा लागतो. कारण ते अतिशय वैविध्यपूर्ण आणि परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होत. कार्यकर्त्या पत्रकाराचा जन्मजात पिंड असणारे अनिल अवचट यांचे समाजभान व्यापक व प्रगल्भ होते. 'बाबा ' या नावाने सर्वदूर ,सर्वव्यापी, अबालवृद्धांशी संपर्क असणारा हा खरंच बाप माणूस होता.डॉक्टर,पत्रकार,संपादक, लेखक,चळवळ्या, समुपदेशक, मार्गदर्शक, चित्रकार,छायाचित्रकार,शिल्पकार,ओरिगामीकार ,जादूगार, बासरीवादक अशा विविध रुपात ते दिसत असत. त्यांच्या लेखणीचा आणि वाणीचा पिंड अतिशय वेगळा होता. त्यामुळे समाजजीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये अनिल अवचट उर्फ बाबा सुपरिचित होते. सर्वाना ते आपले वाटत होते. अतिशय व्यापक व संपन्न व्यक्तिमत्व असलेले आल्या बाबांचा कधीही बडेजाव दिसला नाही.
अनिल अवचट यांची पुस्तके तर वाचनीय आहेतच.पण त्यांच्या पुस्तकांच्या अर्पण पत्रिकाही त्यांच्यातील सजग व सहृदय लेखकाचे टोकदार दर्शन घडवितात.उदाहरण म्हणून काही पुस्तकांच्या अर्पण पत्रिका मुद्दाम नमूद करतो आहे. 'धागे उभे आडवे' हे पुस्तक ' यातनायंत्रात सापडलेल्या मानव समूहांना ' अर्पण केले आहे. 'लाकूड कोरतांना ' हे पुस्तक ' ' ' 'स्वतः पटाशीचे घाव सोसून ,हातोडीचे कित्येक दणके सहन करून मला भरभरून सौंदर्यानंद देणाऱ्या माझ्या सर्व आवडत्या लाकडांना...' त्यांनी अर्पण केले आहे. ' माणसं 'हे पुस्तक त्यांनी ' समाजाने ज्यांना भटकंती बहाल केली त्या सर्व उपर्यांना अपराधी भावनेने अर्पण '....केले आहे. ' प्रश्न आणि प्रश्न ' हे पुस्तक त्यांनी 'म्हातारपणीही जीवघेणे श्रम करणाऱ्या वृद्ध कष्टकऱ्यांना : हतबल भावनेने..अर्पण केले आहे. ' माझी चित्तरकथा' हे पुस्तक त्यांनी 'जगातील तमाम नादिष्ट माणसांना ' अर्पण केले आहे.याशिवाय बाबा आढाव, माळवे गुरुजी ,सुनंदाताई, गाडगेबाबा बर्ट्रांड रसेल , मुक्ता व यशोधरा यांना अर्पण केलेली पुस्तके त्यांची त्यांची वैशिष्ट्ये अधोरेखित करणारी आहेत.
'माझी चित्तरकथा' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अनिल अवचट यांनी कला आणि जीवन याबाबत मौलिक भाष्य केले आहे. ते म्हणतात,'..... निसर्गाने कलावंत ही वेगळी जमात निर्माण केली आहे असं मला वाटत नाही.प्रत्येकात निर्मितीची बीजं असतातच. पण पालक ,शाळा ,भोवतीचे कॉमेंट करणारे लोक या सगळ्यामुळे ती रुजली जात नाहीत, बुजून जातात. अमका माणूस लेखक, तमका चित्रकार, अमका गायक..अशा जमाती का निर्माण व्हाव्यात ? आदिवासी सगळे भिंतीवर चित्र काढतात ,सगळे मिळून गातात आणि नाचतात. त्यांच्यात ड्रम वाजवणारा असतो तो काही झाकीर हुसेन नसतो. मग हे सगळे स्पेशलायझेशनच्या युगात झालं काय ? गाण्याला, मैफलीला जायचं ,पण श्रोते म्हणून. आपण कधी गुणगुणायच नाही.चित्रं नुसती पहायची, पण स्वतःच्या रेघेबरोबर वाहत जायचं नाही.बहुतेक सगळ्यांनी निष्क्रिय राहायचं. फार फार तर कलावंत मंडळीनी निर्मिलेल्या कलाकृतींचा आस्वाद घ्यायचा.( पण त्या तर श्रीमंतांच्या घरात बंदिस्त आहेत.) आपण हे ओझं दूर करूयात. तुझं गाणं तू गा,तुझं चित्र तू काढ, असं म्हणून प्रोत्साहन देऊयात. त्यातही काही चांगले कलाकार होतील. त्यांना नैसर्गिक अनुकूलता असेल.कोणाचा गाता गळा, कोणाचा काढता हात. मग लोकांमध्ये आज जेवढा फरक आहे तेवढा राहणार नाही. त्यांच्यातला बघेपणा आणि बशेपणा नष्ट झाला ,त्यांच्यातला न्यूनगंड नष्ट झाला तर जास्त संख्येने कलावंत पुढे येतील. आणि संस्कृती आणखीनच समृद्ध होईल. आजच्या श्रीमंत रसिकांच्या बंदिस्त जगातून ती व्यापक जगात येईल.'
मला वाटतं ,आपण माणूस म्हणून आणि समाज म्हणून समृद्ध व्हायचं असेल तर बाबाचा हा विचार आपण निश्चयपूर्वक स्वीकारला पाहिजे.
साहित्यापासून व्यसनमुक्तीपर्यंत आणि चित्रकारीपासून बासरीवादनापर्यंत त्यांनी केलेले काम आणि उमटवलेला ठसा अनमोल स्वरूपाचा आहे.अशा या बहुआयामी बाबांचा कित्येक वर्षाचा माझा स्नेह होता. समाजवादी प्रबोधिनीच्या कार्याविषयी त्यांना मोठी आस्था होती.गेली कित्येक वर्षे समाजवादी प्रबोधिनीत अल्कोहोलिक ॲनॉनिमसचे व्यसनमुक्ती केंद्र सुरू आहे.दीपक सोमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने वीस वर्षांहून अधिक काळ व्यसनमुक्ती केंद्राच्या साप्ताहिक बैठका नियमितपणे समाजवादी प्रबोधिनीत होत असतात. या कामाला समाजवादी प्रबोधिनीचे सातत्यपूर्ण सहकार्य असते.या केंद्राच्या,बैठकांच्या निमित्ताने बाबा अनेकदा येथे येत असत. त्यांच्याशी होणारा संवाद हा नेहमीच प्रत्येकाला अतिशय सकारात्मक उर्जा देणारा असायचा. ज्याच्या केवळ सानिध्यातुनही जीवनानंदी संस्कार घडायचे असा हा बाबा होता.अनिल अवचट यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्य -संस्कृती - कला - विज्ञान - पत्रकारिता अशा बहुमुखी पर्यावरणाचा एक बुरुज ढासळला आहे. जीवनाच्या वास्तवाला भिडून जगण्याची कला शिकविणारा एक बाप माणूस आपण गमावला आहे. मराठी भाषा ,मराठी संस्कृती, मराठी मन, मराठी मानस संपन्न करण्यात आयुष्य खर्ची घालणारा एक मनुष्यकेंद्री विचार करणारा एक वैश्विक माणूस,जीवनाचा कलासक्त भाष्यकार बाबांच्या जाण्याने आपण गमावला आहे.त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन..!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली तेहत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)