गरिबांचा बळी देऊन श्रीमंतांची तरतूद करणारा हा अर्थसंकल्प आहे

 ज्येष्ठ अर्थतज्ञ व समाजवादी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.जे.एफ.पाटील



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. १७ वस्तू व सेवा क्षेत्रातील उत्पादन क्षमतेत वाढ ,रोजगार वृद्धी आणि भावपातळीच्या वाढीचा वेग नियंत्रित ठेवणे ही कोणत्याही अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्टये असावी लागतात. गेल्या दोन वर्षात कोव्हिड काळात झालेली उत्पादन घट ,करोडोंचा रोजगार जाणे,छोटे मोठे उद्योग बंद होणे यासारख्या महत्त्वाच्या मूलभूत प्रश्नांवर गंभीरपणे विचार न करता गरिबांचा बळी देऊन श्रीमंतांची तरतूद करणारा हा अर्थसंकल्प आहे असे मत ज्येष्ठ अर्थतज्ञ व समाजवादी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित व्याख्यानात "केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३" या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य. डॉ.टी. एस. पाटील होते. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रारंभी प्रबोधिनीचे संस्थापक आचार्य शांताराम गरुड यांचा पंचाणव्वा जन्मदिन,प्रा.डॉ. एन. डी. पाटील यांचा पहिला मासिक स्मृतिदिन आणि शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा सातवा स्मृतिदिन यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी 'प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाच्या फेब्रुवारीच्या अंकाचे प्रकाशनही करण्यात आले.

 प्रा डॉ.जे.एफ.पाटील म्हणाले ,अर्थसंकल्प सरकार चालवण्यासाठी नसतो तर समाजाची अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी असतो. आज देशातील १९ ते ३५ या वयोगटातील बेरोजगारी मोठी आहे. त्यातील सुशिक्षितांची बेरोजगारी फार मोठी आहे आणि महिलांची बेरोजगारी तर प्रचंड मोठी आहे. अशावेळी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेवरील खर्च  चाळीस टक्के कमी करणे,आरोग्य ,शिक्षण आदी महत्वाच्या खर्चात पुरेशी वाढ न करणे हे अतिशय चुकीचे आहे.वास्तविक राष्टीय शहरी रोजगार योजना राबविण्याची नितांत गरज आहे.वास्तविक सरकारकडे परकीय चलन साठा मोठा आहे.गेल्या काही महिन्यात निर्यातीचे प्रमाण वाढत आहे.दरमहा जीएसटी चांगला जमा होत आहे.असे असूनही त्याचा लाभ सर्वसामान्यांना हा अर्थसंकल्प देऊ शकत नाही. चुकीचे प्रयोग करणे हे या सरकारचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात' सेंट्रल बँक डिजिटल करन्सी' करण्याच्या योजनेत पुन्हा दिसून आले आहे. वास्तविक सीबीडीसी चा म्हणजे कुटचलनाचा हा निर्णय नोटाबंदी नंतरचा सर्वात घातक निर्णय ठरण्याची शक्यता आहे.कदाचित सरकारला त्यातून स्वतःच माघार घ्यावी लागेल. प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाची सखोल मांडणी केली. तसेच श्रोत्यांच्या शंकांचे निरसनही केले. प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी शशांक बावचकर,डॉ.चिदानंद आवळेकर , डॉ.तुषार घाटगे,जयकुमार कोले,प्राचार्य ए.बी.पाटील,अशोक केसरकर, तुकाराम अपराध,अन्वर पटेल यांच्यासह अनेक जिज्ञासू बंधू - भगिनी उपस्थित होते. पांडुरंग पिसे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post