इचलकरंजीतील एलसीबीचे कार्यालय जिल्हा पोलिस अधिक्षकांनी तडका फडकी बंद केले.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत सुरू केलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण कार्यालय अर्थात एलसीबीचे कार्यालय जिल्हा पोलिस अधिक्षकांनी तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या निर्णयावर इचलकरंजी पोलिसांनी वरिष्ठांची विश्वासार्हता गमावली की काय?, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे. दुसर्‍या बाजुला संधी मिळेल त्या प्रकरणात 'तडजोड' हेही मुख्य कारण असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

इचलकरंजी शहरात औद्योगिक वाढीसोबत गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले आहे. गेल्या दीड वर्षांत तब्बल १५ हून अधिक खुनाच्या घटना घडल्या आहेत. खुनाचा प्रयत्न, खंडणी, शस्त्राचा धाक दाखविणे, दहशत माजवणे आदी प्रकारही सुरूच आहेत. याला राजकीय आश्रयही काहीअंशी कारणीभूत आहे.

इचलकरंजी शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था गावभाग, शिवाजीनगर, शहापूर आदी तीन पोलिस ठाण्यांसह गुन्हेगारांचा शोध आणि अत्यंत संवेदनशील कामात या पोलिस ठाण्यांना मदत व्हावी यासाठी स्थानिक गुन्हे अन्वषण शाखेचे कार्यालयही इचलकरंजीत सुरू केले. गेल्या काही वर्षांत या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाया, महत्वाच्या गुन्ह्यात सहभागाची भूमिका यामुळे या कार्यालयाच्या कारभाराचे पोलिस अधिकार्‍यांसह नागरिकांनीही तितकेच कौतुक केले

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारभाराचा वेगळात अनुभव शहरवासियांना येत होता. येथे काम करण्याची संधी मिळाली म्हणजे माया मिळवण्याचा परवानाच अशा आविर्भावात येथील कारभार अनेकांच्या डोळ्यात दिसून येत होता. येथील कारवायाही काही विशिष्ट व्यवसायापुरत्याच मर्यादित झाल्या होत्या. अनेकवेळा सेटलमेंट नाही झाली तरच कारवाई, हा पायंडाही येथे रुजला होता. या प्रवृत्तीला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चाप लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

यापूर्वीही कार्यालयाचा कारभार तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुखांच्या खमक्या भूमिकेमुळे चर्चेत आला होता. मोकासारख्या गुन्ह्यात आरोपी मिळत नसल्याने व या आरोपींशी संगनमत असल्याच्या कारणातून येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयातील काही कर्मचार्‍यांची बदली मुख्यालयाकडे केली होती. याच पध्दतीने जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी पुन्हा एकदा अधिकार्‍यांना झटका देत एलसीबी कार्यालय बंद केल्याने येथील गैरकारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post