वस्त्रनगरीत कलात्मक चित्ररुपातून उलगडली ऐतिहासिक कला - संस्कृती !



प्रेस मीडिया ऑनलाइन :

इचलकरंजी : उभे - आडवे धागे विणत मानवाची वस्त्राची गरज पूर्ण करणारी वस्त्रनगरी अशी इचलकरंजी शहराची ओळख सर्वदूर पोहचली आहे.या नगरीला ऐतिहासिक थोर कला - संस्कृतीच्या परंपरेचा वारसा देखील लाभला आहे. तोच आता गंगामाई  विद्यालयाने आपल्या विद्यालयाच्या मुख्य कंपौंडवर मोठ्या कलात्मकतेने चित्ररुपातून उलगडून ऐतिहासिक वैभवाची माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देतानाच शिक्षण ,पर्यावरण ,आरोग्य ,कला अशा विविध विषयांवर प्रभावीपणे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.यानिमित्ताने शहराच्या वैभवात नव्यानं आणखी एक मोलाची भर पडली आहे.



कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व इचलकरंजी शहराचे कला ,संस्कृती यामध्ये नेहमीच एक वेगळेपण राहिले आहे. यामध्ये इचलकरंजी शहर हे यंत्रमाग उद्योग व त्याच्याशी निगडीत उद्योगांमुळे रिकाम्या हातांना सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन देणारे ठरले आहे. त्यामुळे या वस्त्रनगरीची ओळख कष्टकऱ्यांचे शहर अशीही असून ती आता सर्वदूर पोहचली आहे.

करवीर संस्थानचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज व इचलकरंजी संस्थानचे अधिपती नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी आपल्या काळात ऐतिहासिक कला - संस्कृतीला मोठा राजाश्रय दिला होता.त्यानंतरच्या काळात पुढे याच कला - संस्कृतीला लोकाश्रयही देखील मिळत राहिला आहे.त्यामुळेच आज कोल्हापूर जिल्ह्यातील बहरलेली विविध कला - संस्कृती मोठी लौकिकाची ठरुन ती आता संशोधनाचा विषय ठरली आहे.इचलकरंजी संस्थानचे अधिपती कै.नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या मोठ्या दूरदृष्टीतून आधुनिकतेची कास धरलेल्या यंत्रमाग उद्योगातील रोजगाराच्या निमित्ताने या शहरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याबरोबरच कर्नाटक ,राजस्थान ,उत्तरप्रदेश ,बिहार व अन्य राज्यातील अनेक कुटूंबे कायमची स्थायिक झाली आहेत. त्यामुळेच याठिकाणी महाराष्ट्र राज्याबरोबरच विविध राज्यातील कला -  संस्कृतीच्या परंपरांचा मोठा मिलाफ अनुभवायला मिळतो.असे असूनही विविध वैभवाने नटलेल्या वस्त्रनगरीत मुळच्या संस्कृती - परंपरेला कुठेच जराही धक्का पोहचलेला नाही.हेच नव्यानं अधोरेखित करण्याचा प्रयत्न आता गंगामाई विद्यालयाने मोठ्या कलात्मक चित्ररुपातून मांडून केला आहे. मंगलधाम समोरील गंगामाई विद्यालयाच्या मुख्य कंपौंडवर सादिक गैबान व शुभम कांबळे या दोघा कलाकारांनी कोल्हापूर शहरातील रंकाळा ,भवानी मंडप ,अंबाबाई मंदिर ,कोल्हापूरी चप्पल तसेच

इचलकरंजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ,महात्मा गांधी पुतळा ,वस्त्रोद्योग , राजवाडा ,पंचगंगा घाट ,जनता बँक ,गंगामाई विद्यालय अशा विविध ऐतिहासिक वास्तू ,स्थळे अगदी कलात्मकतेने चित्रांमधून रेखाटली आहेत.याशिवाय शिक्षण ,पर्यावरण ,क्रीडा ,सांस्कृतिक ,

कला ,संस्कृती ,आरोग्य ,राष्ट्रीय प्रतिके ,संशोधन अशा विषयांवर कल्पकतेतून चित्रे रेखाटून नागरिकांच्या ज्ञानात वैविध्यपूर्ण माहितीची भर घालतानाच महाराष्ट्राचं मँचेस्टर नगर ,सुंदर आमचं इचलकरंजी शहर किंवा ऐतिहासिक परंपरा अन् वारसा शाहूंचा ,कोल्हापूर जिल्हा अभिमान असे आमचा अशा मौलिक घोषणात्मक संदेशातून प्रबोधनाचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे.यासाठी गंगामाई विद्यालयाचे संचालक मंडळ ,सर्व शिक्षिका व कर्मचाऱ्यांचे देखील मोठे सहकार्य लाभले आहे.यानिमित्ताने वस्त्रनगरीच्या वैभवात नव्यानं मोलाचीमोठी भर पडली आहे.त्यामुळे शहराचे अनमोल ऐतिहासिक वैभव कलात्मकचित्ररुपातून अनुभवणं ,ही देखील शहरवासियांना अनोखी पर्वणी ठरणार आहे. 


- सागर बाणदार

Post a Comment

Previous Post Next Post