प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी - येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश अण्णाप्पा गडगे (वय ५५, रा. स्वामी अपार्टमेंट, इचलकरंजी) यांचा मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरासमोर निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. तरी पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गडगे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे माजी अध्यक्ष होते. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणूनही ते कार्यरत होते. मंगळवारी रात्री उशिरा नेहमीच्या सवयीप्रमाणे भटक्या कुत्र्यांना बिस्कीट घालण्यासाठी ते घरासमोर थांबले असता अचानक हल्लेखोराने चाकूसारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार केला आणि पळून गेले. त्यात ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरून नागरिकांनी त्यांना उपचारासाठी आयजी रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.