क्रिप्टोकरन्सीच्या विविध बाजू समजून घ्याव्या लागतील.... तोसिफ नदाफ यांचे मत



प्रेस मीडिया ऑनलाइन :

इचलकरंजी ता. १३ क्रिप्टोकरन्सी अर्थात खासगी कुटचलन हा तंत्रज्ञानाशी संबंधित व सरकारी नियंत्रणाबाहेरचा विषय आहे.देशाची आर्थिक स्थिरता त्यावर अवलंबून नाही.सरकार सरकारी चलन नियंत्रित करू शकते व करतेही पण खासगी कुटचलनात तसे  होऊ शकत नाही.जगाच्या सातशे कोटी लोकसंख्येपैकी अडीच कोटी लोक क्रिप्टोकरन्सीशी संबंधित आहेत.तर भारत हा क्रिप्टोकरन्सी मधील सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे.हा विषय गेल्या दशकभरात उदयाला आला आणि गेल्या दोन - चार वर्षात अधिक चर्चेत आला.यावर्षीच्या केंदीय अर्थसंकल्पात त्यावर तीस टक्के कर लावला गेल्याने त्याची नव्याने व्यापक चर्चा सुरू झाली.या विषयाच्या अनेक बाजू असून तो सखोलपणे समजून घेण्याची गरज आहे असे मत डिजिटल अर्थव्यवहार विषयाचे तरुण अभ्यासक तोसिफ नदाफ यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चसत्रात 'क्रिप्टोकरन्सी ' या विषयावर बोलत होते.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.प्रा.रमेश लवटे यांनी पाहुण्यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. तोसिफ नदाफ यांनी या विषयीची अनेक उदाहरणांसह मांडणी केली.प्रारंभी भारतरत्न लता मंगेशकर व  ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांना आदरांजली वाहण्यात आली.

              या मांडणीनंतर या विषयावर व्यापक चर्चा करण्यात आली. क्रिप्टोकरन्सीला अंतरजालीय चलन म्हणूनही ओळखले जाते. बिटकॉईन हे त्याचेच उदाहरण आहे. क्रिप्टोग्राफीद्वारे वापरली जाणारी ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. ही आभासी मालमत्ता नव भांडवली अर्थव्यवस्थाचे उदाहरण म्हणून पहावे लागेल. कल्याणकारी, मिश्र ,साम्यवादी अशा अनेक अर्थव्यवस्था आहेत. त्यामध्ये सामान्य माणसाचा विचार सरकारी धोरणे,नियोजनाद्वारे करीत असतात. पण  क्रिप्टोकरन्सी ही केवळ व्यक्तिगत पातळीवरची असून त्यातून देशाच्या बँकिंग व्यवस्थेला,पतधोरणाला हानी पोहोचण्याची शक्यता जास्त असते.वास्तव आणि आभास यातील फरक समजून घेण्याची नितांत गरज आहे. जागतिक अर्थव्यवस्था  नवभांडवलशाहीच्या माफियापद्धतीने वाटचाल करत आहे.

चिमुटभर सारकरधार्जिणे भांडवलदार गुणाकाराच्या श्रेणीने श्रीमंत होत जाणे आणि करोडो जनता दारिद्र्याच्या खाईत लोटत जाणे हे सध्याच्या भांडवली धोरणाचे फळ आहेच. त्यात ही क्रिप्टोकरन्सी सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे. हे सारे विकासाच्या खऱ्या परिभाषेपासून दूर जाणारे आहे.तसेच आभासी पद्धतीची वाटचाल ही अंतिमतः विषमतेची दरी रुंदावणारे ठरत असते. भांडवलशाहीच्या पोटातच अंतर्विरोध लपलेले असतात हे आजवर अनेक पद्धतीने सिद्ध झालेले आहे. क्रिप्टोकरन्सी हे त्याचेच एक उदाहरण आहे. या विषयावर मांडणीच्या व प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात विस्तृत स्वरूपाची चर्चा झाली. यावेळी शशांक बावचकर,पांडुरंग पिसे,अशोक केसरकर, तुकाराम अपराध,सचिन पाटोळे,दयानंद लिपारे,शकील मुल्ला,रामभाऊ ठिकणे,महालिंग कोळेकर,श्रेयस लिपारे,शहाजी धस्ते,आनंद जाधव आदी उपस्थित होते.सचिन पाटोळे यांनी चर्चेचा समारोप केला व आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post