प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी - 'जगाला विवेकवादी प्रेमाची गरज आहे. व्यक्तिमत्व विकासाच्या चळवळीची गरज आहे. माझ्यातील लेखक घडविण्यात महाविद्यालयाच्या विवेकचा वाटा असून इचलकरंजी परिसरातील लेखक, कवी, पत्रकार घडविण्यातही विवेकचे योगदान मोलाचे आहे. माणसांचे माणसापासून तुटलेपण हे आजच्या काळातील आव्हान आहे. झुंडशाहीला विरोध करायचा असेल तर मानवी प्रेमभावना जागृत व्हायला हवी .आजकाल पुस्तकांचे वाचन कमी होणे ही गंभीर गोष्ट आहे. भरपूर वाचले तर थोडेफार लिहिता येऊ शकेल असे मत ' प्रबोधन प्रकाशन ज्योती 'मासिकाचे संपादक प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या इचलकरंजी येथील डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयाच्या *विवेक* वार्षिक अंकाच्या प्रकाशन करतांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही.एस.ढेकळे यावेळी म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला वाव देण्याचे काम महाविद्यालयाचा वार्षिक अंक करीत असतो.विद्यार्थ्यांनी सातत्याने लेखन करणे आवश्यक आहे. '
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विवेक वार्षिक अंकाचे संपादक प्रा. (डॉ.) एकनाथ आळवेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सौ. एस. जे. वेल्हाळ यांनी करून दिला तर आभार डॉ.एन एच शेख यांनी मानले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. विश्वंभर कुलकर्णी यांनी पार पाडली. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ ठिकणे,महाविद्यालयाच्या सकाळ सत्राचे इनचार्ज प्राचार्य डॉ. डी.सी.कांबळे, प्रा. कटकोळे ,ग्रंथपाल विजय यादव, डॉ. गाणबावले, प्रा.सौ.मोरे ,प्रा.मोरे,डॉ.सनदी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.