आई म्हणजे सुसंस्काराचं चालतं - बोलतं विद्यापीठ असतं...तिच्या ऋणातून कधीच कुणी उतराई होवू शकत नाही...अगदी तसंच समाजाच्या अगणित ऋणाचं देखील असतं...पण ,याची जाणीव फार कमी लोकांना असते...आपण शिक्षण घेवून कितीही मोठं झालो ,पैसा -संपत्ती त्याचबरोबर प्रतिष्ठाही मिळवली तरीही गावाशी असलेली ऋणानुबंधाची नाळ कधीही तुटू द्यायची नाही ,याच जाणीवेतून नरंदे गावचे सुपूत्र दादासाहेब चौगुले व संजय चौगुले या दोघा बंधूंनी आपली जन्मदाती आई कै.सुनंदा अण्णासाहेब चौगुले यांच्या स्मरणार्थ नरंदे ग्रामस्थांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिका प्रदान करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सुमारे ९ लाख इतका आर्थिक खर्च असून तो स्वतः या चौगुले बंधूंनी उचलला आहे.त्यांची जन्मदाती आई सुनंदा अण्णासाहेब चौगुले यांना ८ नोव्हेंबर २०२१ रोजी देवाज्ञा झाली आहे.त्यामुळे आईच्या निरपेक्ष प्रेमाची उणीव कधीच भरुन येणारी नाही ,पण तिचे सुसंस्कार कायम स्मरणात रहावेत ,यासाठी दादासाहेब व संजय चौगुले व त्यांचे संपूर्ण कुटूंब विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे.
वास्तविक ,दादासाहेब चौगुले हे सध्या इचलकरंजीत व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत.तर त्यांचे बंधू संजय चौगुले हे उद्योजक आहेत. या दोघा बंधूंबरोबरच त्यांच्या पत्नी ,बहिण व घरातील सर्वच कुटूंबियांवर धार्मिक व सामाजिक संस्कार करण्यात अण्णासाहेब व सुनंदा या दाम्पत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.त्यामुळेच या दोघा चौगुले बंधूंनी स्वतःची कौटुंबिक जबाबदारी नेटाने पार पाडतानाच नरंदे गावच्या सर्वांगीण विकासात भरीव योगदान देण्यासाठी विविध माध्यमातून मदतीचे कार्य सुरु ठेवून सामाजिक बांधिलकीच्या आदर्श कार्याचा वस्तुपाठ समाजासमोर घालून दिला आहे. याच अनुषंगाने आपत्कालीन काळात रुग्णांची वैद्यकीय उपचारासाठी हेळसांड न होता तातडीने उपचार व्हावेत यासाठी आपली आई कै.सुनंदा चौगुले यांच्या स्मरणार्थ
नरंदे गावासाठी रुग्णवाहिका प्रदान करण्याचा केलेला विधायक कार्याचा हा संकल्प आता लवकरच पूर्ण होणार आहे.या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा येत्या रविवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नरंदे ग्रामपंचायतीच्या पटांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. हा सोहळा शरद उद्योग समूहाचे प्रमुख ,आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्या हस्ते तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ,माजी खासदार राजू शेट्टी ,शिक्षक आमदार जयंत आसगांवकर ,आमदार राजूबाबा आवळे ,जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले ,माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपत गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.खरंतर ,हा सोहळा म्हणजे नावासाठी नाहीतर गावाच्या भल्यासाठी याच प्रामाणिक उदात्त हेतूने होत आहे. त्यामुळे या सोहळ्यास उपस्थित राहणे ,हा समाज ऋणातून उतराई होण्याच्या धडपडीतून विधायक व चांगुलपणाचे दर्शन घडवणारा अनमोल ठेवा ठरणार आहे.
- सागर बाणदार