प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. २७ भाषा आणि विज्ञानाकडे पाहण्यासाठी विवेकाची दुर्बीण वापरणे अत्यन्त महत्वाचे असते. विज्ञानाचे मर्म जाणण्यासाठी दृष्टिकोन विकसित व्हावा लागतो.तो दृष्टिकोन विकसित करण्याचे काम भाषा करत असते. मराठी भाषा अभिजात भाषा असण्याचे सर्व निकष पूर्ण करते.त्यामुळे प्रा.रंगनाथ पठारे समितीचा अहवाल मान्य करून केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा अधिकृत दर्जा जाहीर केला पाहिजे असे मत तरुण शिक्षक अभ्यासक देवदत्त कुंभार यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने मराठी राजभाषा दिन अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन यानिमित्ताने आयोजित व्याख्यानात ' भाषा आणि विज्ञान ' या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.एफ.एम.पटेल आहेत.प्रारंभी डॉ.पटेल यांच्या हस्ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.राजन मुठाणे यांनी पाहुण्यांचे ग्रंथ देऊन स्वागत केले.
देवदत्त कुंभार म्हणाले,भाषा व विज्ञान यांचा परस्पर संबंध विचाराधारीत असतो.स्थित्यंतर,परिवर्तन हे भाषा व विज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण असते.आजच्या युध्दजन्य परिस्थितीत सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी भाषा व विज्ञानाकडे सजगपणे पाहिले पाहिजे. देवदत्त कुंभार यांनी भाषा व विज्ञान या विषयाची सखोल मांडणी केली.
अध्यक्षीयस्थाना वरून बोलताना प्रा.डॉ.एफ.एम.पटेल म्हणाले, विशेष ज्ञान देते ते विज्ञान.हे विज्ञान समजून देत आपल्याला समृद्ध करण्याचे काम भाषा करत असते.मराठी भाषेला प्राचीन इतिहास आहे.मराठी संतपरंपरेने विवेकवाद रुजविण्याचा मोठा प्रयत्न केला.तो विचार पुढे नेणे गरजेचे आहे.यावेळी प्रा.रमेश लवटे,प्रा.डॉ.सुभाष जाधव,राजन मुठाणे, प्रा.सौरभ मोरे,दयानंद लिपारे,अशोक केसरकर,तुकाराम अपराध, रामभाऊ ठिकणे,पांडुरंग पिसे,सचिन पाटोळे,महालिंग कोळेकर,सत्वशील हळदकर ,आनंद जाधव,नामदेव धुमाळे आदी उपस्थित होते.प्रा.सौरभ पाटणकर यांनी आभार मानले