लाखो भाविकांचे जागृत तिर्थक्षेत्र : सौंदत्ती रेणुकामाता देवी



प्रेस मीडिया लाईव्ह : 

     दोन वर्षांपूर्वी नोहेंबर महिन्यांत सौंदत्ती या तीर्थक्षेत्रास जाण्याचा योग आला. चोवीस तारखेस रविवारी सकाळीच प्रवासास सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यामध्ये श्री.रेणुकामाता देवीची [यल्लम्मा] मुख्य यात्रा असते. त्यासाठीच मला देवस्थान व्यवस्थापन समितीला भेट देणे गरजेचे वाटले. कोल्हापूर-बेळगांव प्रवासाचा पहिला टप्पा पार पाडत मी बेळगांव-सौंदत्ती बसमध्ये चढले आणि कन्नड भाषेचा संपर्क वाढला. सकाळी कोल्हापूर येथून साडेसात वाजता निघाले ते दुपारी साडेबाराच्या सुमारास सौंदत्तीला पोहोचले. अनेक वर्षांनंतर झालेली नातेवाईकांची भेट मनाला अत्यानंद देऊन गेली. ग्रामीण जीवन , वागण्या-बोलण्यातला साधेपणा स्पष्ट दिसून आला .मनमोकळ्या गप्पांमध्ये दिवस कसा गेला ,हे समजलेच नाही. संध्याकाळी विठोबा मंदिरात भजनाचा कार्यक्रमही होता. सर्व घरची मंडळी तिकडेच निघाली. छोट्या गावांतून  फिरताना मला एक वेगळाच आनंद मिळाला. कन्नड प्रांतातही मराठीतील अभंगसुरांनी ताल धरून मंत्रमुग्ध केले. कार्तिक महिना असलेने माझ्या नातलगांनी त्या संध्याकाळी मंदिरात दीपोत्सव कार्यक्रम ठरवला होता. संध्याकाळने गडद रूप धारण करताच संपूर्ण देवालय आणि परिसर दिव्यांनी लख्ख उजळून निघाला. घरी परतताना अजून काही छोट्या छोट्या देवळांना भेट देता आली.  

सोमवार सकाळीच रेणुकामाता

देवीच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. मी राहिले ते नातेवाईक या गावचे देसाई आहेत. त्यामुळेच थेट देवस्थानच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून मला माहिती देण्यास सहकार्य करावे ,असे त्यांनी सर्वांना सांगितले. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर देवीचा डोंगर [यल्लम्मगुड्डा] आहे. सौंदत्ती गावांतून तिथे जाणेसाठी सतत वाहनांची सोय आहे. ग्रामीण भागांतील दळणवळणाच्या या सोयीसुविधा पाहून मन समाधानाने भरून गेले. सौंदती स्टँडवर उतरल्यापासून माझी मावसभावंडे सोबत होतीच.तेही आज माझ्या निमित्ताने देवीच्या दर्शनाला यायला तयार झाले. पुढे थोड्याच वेळांत डोंगरावर पोहोचलो. देवीदर्शनासाठी सर्वजण आलो आहोत, याची देवस्थान समितीला कल्पना होती. त्यांनीही लगेचच दखल घेतली. त्यादिवशी गर्दीही फार नव्हती. आम्ही पूजा साहित्य घेऊन कळसाचे दर्शन घेत मंदिरात प्रवेश केला. दर्शनरांगेचे व्यवस्थापक, सुरक्षारक्षक या सर्वांची ओळख झाली. लेखनकार्याचा आदर आणि सौंदत्तीस या कामाच्या निमित्ताने येणे याचे सर्व श्रेय त्या देवतेस द्यावे वाटले. देवीचे दर्शन होताच देवस्थान समितीच्या लोकांसोबत माहिती घेण्याच्या कामाला त्वरीत सुरुवात केली. 

कन्नड भाषेतून सांगितलेल्या माहितीचा मराठी अनुवाद खाली देत आहे. 

  “ हे देवस्थान तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे. अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे. या देवतेला भाविकांकडून नवस केले जातात. कामधेनू आणि कल्पवृक्षाप्रमाणे श्रीरेणुकामाता देवी ही भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करते. देवीचे यल्लम्मा या प्रचलित नावाची आख्यायिका जी मी लहानपणी ऐकली होती ,तिचे स्मरण हे लेखन करताना झाले. पुरातन काळी एक स्त्री या गावच्या आसपासच्या डोंगराळ भागांत फिरत होती. त्यावेळी जी माणसे तिला भेटत होती, थांबवून विचारपूस करीत होती “यल्ले अम्मा होगुदू?” – तुला कुठे जायचे आहे? त्या शब्दांचा अपभ्रंश होऊन यल्लम्मा याच नावाचा प्रघात पडला. येथे सगळ्याच प्रदेशातून भाविक येत असतात. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील असतात. प्रत्येक पौर्णिमेला जत्रा भरत असते. येणाऱ्या भक्तसमुदायाची व्यवस्था चांगली व्हावी, यांसाठी देवालय आणि डोंगर परिसरात निवासस्थानाची सोय आहे. त्याशिवाय सौंदत्ती गावच्या आसपासही रहाता येते. पौर्णिमेच्या जत्रेशिवाय इतर वेळीही गर्दी असतेच. देवस्थान व्यवस्थापनाकडून नियोजन आणि भक्तांच्या सहाय्याने अन्नदानाचे कार्य सुरूच असते.” विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिल्याबद्दल मी सौंदत्ती देवस्थान समितीचे मनपूर्वक आभार मानले. गावाकडे प्रवास सुरू असताना वाटेतच मलप्रभा नदीकाठी असलेल्या सत्यवती देवीचे मंदिर पहाता आले. एकीकडे स्नानकुंड तर दुसऱ्या बाजूस मलप्रभा नदीचे शांत रूप पहायला मिळाले. बरेच भाविक एक दिवसाच्या सहलीसाठी येथे आल्याचे जाणवले. घरी परत आल्यावर दुसरे दिवशी एका वेगळ्याच अनुभूतीने आशीर्वादाने भारावून सौंदती – कोल्हापूर परतीच्या प्रवासास सुरुवात झाली.


- मेघा कुलकर्णी ,

कोल्हापूर

मो. ७३८७७८७५१२

Post a Comment

Previous Post Next Post