प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२१ एकाच विषयावरील अर्थात संपूर्ण मुसलसल गझल, दोन गझलकारांच्या शंभर गझलांचा संग्रह, गझलेच्या अभ्यासासाठी ' स्वयंअध्ययनाची अंकलीपी ' यासारखी अनेक वैशिष्ट्ये घेऊन मराठी गझल विश्वात आलेला व अल्पावधीत रसिकप्रिय ठरलेला गझलसंग्रह म्हणजे ' गझल प्रेमऋतूची '. मराठीतील जेष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी ( इचलकरंजी )आणि गझलनंदा उर्फ प्रा.सुनंदा पाटील( मुंबई) यांच्या या गझलसंग्रहाला 'करवीर साहित्य परिषद, कोल्हापूरचा प्रथम पुरस्कार ' प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर येथील संत गाडगे महाराज अध्यासन आणि करवीर साहित्य परिषद यांच्या संयुक्त पुरस्कार वितरण समारंभ कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे झाला.यावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त एम.बी. शेख व सुप्रसिद्ध वास्तूरचनाकार एस.एन. पाटील हे प्रमुख पाहुणे होते.अध्यक्षस्थानी आत्मदर्शनचे संचालक संजीव कुलकर्णी होते.' गझल प्रेमऋतूची ' ला मिळालेला हा पुरस्कार प्रसाद कुलकर्णी यांनी स्वीकारला.यावेळी.डॉ. दिलीप कुलकर्णी प्रा.डॉ.बी.एम.हिर्डेकर, प्रा.किसनराव कुराडे,प्राचार्य.डॉ.अर्जुन कुंभार,प्रा.डॉ.चंद्रकांत पोतदार, डॉ.संजीवनी तोफखाने, युवराज कदम,हेमा गंगातीरकर, जयश्री दानवे,प्रा.डॉ.जे.के.पवार आदी मान्यवरांनाही त्यांच्या विविध पुस्तकांसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले. करवीर साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य रा.तू.भगत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष श्याम कुरळे यांनी आभार मानले. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान ' गझल प्रेमऋतूची ' या गझल संग्रहाला मराठी साहित्य मंडळ,ठाणे या संस्थेचा 'सावित्रीबाई फुले पुरस्कारही 'जाहीर झाल्याने प्रसाद कुलकर्णी व गझलनंदा यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात होत आहे.