समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबिना खानम यांचा सणसणीत इशारा
प्रेस मीडिया लाईव्ह :
अलिगढ : कर्नाटकातील हिजाब प्रकरण आता भारतभर पसरायला सुरुवात झालीय.देशाच्या कानाकोपऱ्यात लोक आंदोलन करताना दिसताहेत. या वादात आता सपानं उडी घेतलीय. समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबिना खानम यांनी आज (शनिवार) उत्तर प्रदेशातील अलिगढ मध्ये हिजाब प्रकरणी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, जर कोणी हिजाबला हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात कापले जातील, असा सणसणीत इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी हिजाब बंदीविरोधात निदर्शने केली.
रुबिना खानम पुढे म्हणाल्या, भारतातील मुलींच्या स्वातंत्र्याशी खेळण्याचा कोणी प्रयत्न केला, तर मुलींना झाशीची राणी आणि रजिया सुलताना व्हायला वेळ लागणार नाही. भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर टिळा, डोक्यावर पगडी अथवा हिजाब आहे म्हणून आपण त्यांना वेगळं करणार आहोत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलंय.
घुंघट आणि हिजाब हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य भागात आहेत. या मुद्द्याचं राजकारण करून वाद निर्माण करणं खूपच भयंकर आहे. सरकार कोणताही पक्ष चालवू शकतो, पण महिलांना कमकुवत समजण्याची चूक कोणीही करू नये, असा इशाराही रुबिना यांनी दिलाय. दरम्यान, हिजाब परिधान केल्यामुळं मुस्लिम विद्यार्थिनींच्या एका गटाला उडुपीतील महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर कर्नाटकात हिजाबचा वाद सुरू झाला. त्याचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत.