आज राष्ट्रवादीचे खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत एसटीच्या कृती समितीची बैठक होणार

बैठकीत नेमका या वर काय तोडगा काढला जातो याकडे लक्ष 


प्रेस मीडिया ऑनलाइन : 

 राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले तरी अजूनही काही एसटी कर्मचारी संपातून माघार घ्यायला तयार नाहीत.आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार का याकडे लक्ष लागून आहे. आज राष्ट्रवादीचे खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत एसटीच्या कृती समितीची बैठक होणार आहे. शरद पवार आणि संपकरी कर्मचारी व एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दुपारी 12.30 वाजता ही बैठक होणार आहे.

या बैठकीत पुन्हा एकदा एसटी महामंडळ विलीनिकरणाची मागणी समोर ठेवून त्याबाबत चर्चा होणार आहे. शरद पवारांसोबत परिवहन मंत्री अनिल परब सुद्धा या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. मागील दोन महिन्यांपासून पगार वाढ देऊन सुद्धा कर्मचारी संपातून माघार घेण्यास तयार नसल्याने या बैठकीत नेमका या वर काय तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागून आहे.

महत्वाचे म्हणजे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर ज्या कारवाई करण्यात आल्या त्या कारवाया मागे घेण्याबाबत कर्मचारी संघटनांकडून मागणी केली जाणार आहे. संपाची नोटीस दिलेल्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाशिवाय माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने अद्याप एसटीची सार्वजनिक सेवा सुरू होऊ शकली नाही.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप नेतृत्वहीन असल्याने राज्य सरकारने चर्चा तरी कोणाशी करायची, असा पेच निर्माण झाला आहे. यापूर्वी कृती समितीशी चर्चा करून घरभाडे, महागाई भत्त्याची वाढ देण्यात आली. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून वेतनवाढ देण्यात आली, तर संपकरी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांच्याशी चर्चा करून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली. त्यानंतरही एसटी कर्मचारी मात्र, अद्याप संपावर कायम आहेत. यामुळं शरद पवार यांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या बैठकीकडे लक्ष लागून आहे.

Post a Comment

Previous Post Next Post