उर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनी कडून क्षारपड संस्थांना 11 लाख 90 हजार 500 रुपये चे अनुदान वाटप..
प्रेस मीडिया ऑनलाइन :
शिरोळ : प्रतिनिधी
उर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनी लिमिटेड दत्तनगर शिरोळ यांच्यावतीने क्षारपड जमीन सुधारणे कामाच्या सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सी. एस. आर. फंडातून शिरोळ तालुक्यातील दहा क्षारपड जमीन सुधारणा संस्थांना एकरी 500 रुपये प्रमाणे, 11 लाख 90 हजार पाचशे रुपयांचे अनुदान सोमवारी वाटप करण्यात आले,
दरम्यान , 2 हजार 381 एकर क्षेत्रासाठी हे अनुदान वाटप झाले. येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या सभागृहात कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते क्षारपड जमीन सुधारणा संस्थांना अनुदानाचे धनादेश प्रदान करणेत आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची साथ आणि नवी दृष्टी घेऊन आगामी काळात काम करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रयोगशील कामातून शेती सुधारणा कामांमध्ये यश मिळू शकते हे क्षारपड जमीन सुधारणा कामातून सिद्ध झाले आहे. पाणी, खत, औषधे, मजुरी आशा खर्चाची बचत करावयाची असेल तर सुधारित शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेती करण्याची गरज आहे. ज्या क्षारपड जमीन सुधारणा संस्था शेती बाबत काम करीत आहेत आशा संस्था पुढील काळात शेती उत्पादन, निर्यात, मार्केटिंग करण्या संदर्भात सर्व संस्थांची मिळून एक फेडरेशन संस्था स्थापन करण्याचा मानस असून त्या संस्थाच्या माध्यमातून भविष्यात शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा करण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही ते म्हणाले.
या वेळी कागवाड, घालवाड, कुटवाड, हसूर, शिरोळ, औरवाड, हेरवाड, धरणगुत्ती, राजापूर व जुगुळ येथील दहा क्षारपड जमीन सुधारणा संस्थांना वरील अनुदान देण्यात आले. संचालक शेखर पाटील, आनंद कुलकर्णी, सुकुमार हुक्किरे, सतीश खोंद्रे, भाऊसो खोंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीत कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, दत्त कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, भैय्यासाहेब पाटील, संजय चव्हाण, गुरुदत्त देसाई, अशरफ पटेल, किर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, बाबा पाटील- नरदेकर, तात्या पाटील यांच्यासह शेती विभागाचे ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले तसेच क्षारपड जमीन सुधारणा संस्था पदाधिकारी उपस्थित होते. शेती विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले.