आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्यांना बहिष्कृत केल्याप्रकरणी

     सहा जात पंचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

सांगली : नंदिवाले समाजातील जातपंचायतींने कराड येथे घेतलेला निर्णय अमान्य करून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील सामाजिक बहिष्कार सुरू ठेवणार असल्याचे समाजातील काहींनी जाहीर केले. पलूस येथील झालेल्या या निर्णया विरोधात इस्लामपूर येथील आंतरजातीय विवाह केलेले प्रकाश शंकर भोसले यांनी पलूस पोलीस स्टेशनमध्ये काल, शुक्रवारी (दि.१४) याप्रकरणी फिर्याद दाखल केली. या तक्रारीवरुन सहा पंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्यांना बहिष्कृत केल्याप्रकरणी नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचाविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यानी आग्रही होऊन समाजातून बहिष्कृत करणाऱ्यांवर कारवाई करण्यासासाठी प्रयत्न केले.

या बैठकीमध्ये अंनिस कार्यकर्त्यांनी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार आता कोणालाही समाजातील वाळीत टाकता येत नाही. याची जाणीव करून दिली. तसेच पोलिसांनी पंचांना सामाजिक बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा पंचांनी सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे कबूल केले.

जातपंचायतीचे पंच - विलास शंकर भिंगार्डे, चंद्रकांत बापू पवार (दोघे रा. इस्लामपूर), शामराव श्रीरंग देशमुख, अशोक शंकर भोसले (दोघे रा. दुधोंडी), किसन रामा इंगवले (जुळेवाडी, ता. कराड), विलास बापू मोकाशी (नेहरूनगर, निमणी) या पंचांवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे.

महाराष्ट्रातील नंदिवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा अंदाजे १५० जोडप्यांना नंदिवाले जातपंचांनी समाजातून बहिष्कृत केले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी नंदिवाले समाजातील जातपंचांशी संपर्क करून त्यांची मेढा (जि. सातारा) पोलीस स्टेशनमध्ये बैठक बोलावून त्यांची समजूत काढून बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा पंचांनी सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र काहींनी याला विरोध केला.

नंदीवाले काशी कापडी आणि तीरमल समाजातील आंतरजातीय विवाह केलेल्या अडीचशे जोडप्यांवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याचे त्या समाजातील बहुसंख्य पंचांनी जाहीर केले असले तरी त्यामधील काही पंचांनी नुकतीच पलूस येथे जातपंचायत भरवून काही जोडप्यांच्या वर बहिष्कार चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या जोडप्यांनी सातारा अंनिसकडे तक्रार दिली होती. अंनिसने त्याची तातडीने दखल घेऊन त्यांना घेऊन पलूस पोलीस स्टेशनला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदयानुसार गुन्हा दाखल केला. इस्लामपूर येथील पीडित प्रकाश भोसले यांनी ६ जातपंचायतींवर फिर्याद दाखल केली

Post a Comment

Previous Post Next Post