सांगली : नो मास्क नो एण्ट्री'ची कडक अंमलबजावणी



प्रेस मीडिया ऑनलाइन :

सांगली महापालिका कार्यालयासह खासगी आस्थापनांमध्ये सोमवारपासून 'नो मास्क नो एण्ट्री'ची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोणालाही मास्क शिवाय महापालिका कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.तसेच खासगी आस्थापनाधारकांनीसुद्धा विनामास्क कोणालाही प्रवेश देऊ नये; अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.

आयुक्त कापडणीस म्हणाले, महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या वाढत आहे. याबाबत राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवारपासून महापालिका क्षेत्रात या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. अनेक खासगी आस्थापनांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्यास खासगी आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आस्थापनाधारकांनी आपल्या आस्थापनांमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत.

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी 10 पथके

सोमवारपासून मनपा क्षेत्रात विनामास्क गर्दी केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी सांगली-मिरज-कुपवाड या तिन्ही शहरांत महापालिकेकडून कारवाईसाठी 10 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. याचबरोबर हे पथक खासगी आस्थापनांनाही अचानकपणे भेट देऊन गर्दीबाबत तपासणी करणार आहे. याच बरोबर सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी राहणार असून, अनावश्यक गर्दी करणाऱ्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे.

गरज पडल्यास 'जीपीएम कोविड सेंटर' कार्यान्वित करणार

कोरोना रुग्णसंख्या पाहता, गरज भासल्यास महापालिकेचे 'जीपीएम कोविड सेंटर' पुन्हा कार्यान्वित केले जाणार असून, महापालिकेचा ऑक्सिजन प्लाण्टसुद्धा तयार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावे, सॅनिटायझरचा वापर करावा आणि गर्दी टाळावी, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.

लसीकरणावर अधिक भर

महापालिका क्षेत्रात लसीकरणावर अधिक भर दिला जाणार आहे. 15 ते 18 वयोगटाचे लसीकरण शाळांमध्ये केले जात असून, मनपाच्या दवाखान्यांतसुद्धा केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले. मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी वेळेत आपली तपासणी करून घ्यावी. वेळीच निदान झाल्यास कोरोना संसर्गवाढीला ब्रेक बसेल. त्यामुळे मनपा क्षेत्रात जास्तीत जास्त 'आरटीपीसीआर' चाचण्यांवर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

Post a Comment

Previous Post Next Post