सीसीटीव्हींचे जाळे आता संपूर्ण जिल्ह्यात पसरविण्यात येणार


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

सांगली :  नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सांगली शहर, तासगाव, विटा, ईश्वरपूर, जत येथे अत्याधुनिक सीसीटीव्हींचे जाळे बसविण्यात आले आहे. आता त्यामध्ये आणखी 25 लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे कवठे महांकाळ, शिराळा, आटपाडी या ठिकाणी बसविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्हा पोलीसप्रमुख पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील बिघडलेल्या वाहतुकीला आळा बसण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी अनेक अत्याधुनिक पावले उचलली आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही बसवण्याचा त्यातील प्रमुख निर्णय आहे. 

आतापर्यंत महापालिका क्षेत्रात प्रमुख मार्गांवर तसेच मुख्य चौकाच्या ठिकाणी 140 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या यंत्रणेमुळे अनेक गुन्हे उघडकीस आले. अनेक गुन्हेगारांचा छडा लावण्यात यश आले. तसेच, शहरातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेला या अत्याधुनिक यंत्रणेमुळे शिस्त लागली. आतापर्यंत वाहतूक मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून कोटय़वधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सध्या केवळ शहरातील प्रमुख मार्गांवर असणाऱ्या आणि जिल्ह्यातल्या ईश्वरपूर, विटा, तासगाव, जत या ठिकाणी असणारे सीसीटीव्हींचे जाळे आता संपूर्ण जिल्ह्यात पसरविण्यात येणार आहे. शहरातील छोटे छोटे रस्ते, वर्दळीची ठिकाणे, अपघात क्षेत्र यांसह महत्त्वाच्या ठिकाणी हे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. याबाबतचा सर्व्हे त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभारी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. हा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर सीसीटीव्ही बसविण्याची ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत.

सांगलीसह जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, शिराळा, आटपाडी, कडेगाव या महत्त्वाच्या शहरात देखील सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. हे सीसीटीव्ही जिल्हा नियोजन समिती आणि शासकीय निधीमधून बसविण्यात येणार आहेत. नव्याने बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्हींचे थेट कनेक्शन हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील सीसीटीव्ही सर्व्हिलन्स रूममध्ये असणार आहे. त्याठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. शहरासह जिल्ह्यात घडणाऱ्या घरफोडी, चेन स्नॅचिंग यांसह अनेक गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

सांगलीसह जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये यापूर्वी अत्याधुनिक असे 140 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्हींच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. काही तालुके आणि सांगली महानगरपालिका क्षेत्रातील काही परिसर या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची आवश्यकता होती. त्यानुसार शासकीय निधीतून 25 लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. यासाठीचा सर्व्हे पूर्ण झाला असून, लवकरच हे कॅमेरे बसविण्याचे काम सुरू होईल.

- दीक्षित गेडाम, जिल्हा पोलीस अधीक्षक, सांगली.

Post a Comment

Previous Post Next Post