प्रेस मीडिया ऑनलाइन :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
थकीत बिल बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कडून ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना किंवा नोटीस न देताच पुरवठा खंडित केला जात आहे महावितरणची ही कारवाई बेकायदेशीर असून त्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने दिला आहे तसेच ज्या ग्राहकांना महावितरण मनमानीपणे वीज पुरवठा खंडित केला आहे त्याने वीज ग्राहक संघटनेला माहिती द्यावी असेही स्पष्ट केले आहे.
राज्यात महावितरणचे सुमारे अडीच कोटी वीज ग्राहक आहेत. त्यापैकी सुमारे 1 कोटी 80 लाख ग्राहकांकडे 70 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. त्यापैकी 40 लाख शेतकऱयांकडे सुमारे 42 हजार कोटी रुपये थकीत आहेत. सदरच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे.
दरम्यान, वीज कायदा 2003 मधील कलम 56 नुसार एखाद्या ग्राहकाचा वीज पुरवठा कोणत्याही कारणास्तव खंडित करायचा असेल तर त्याला 15 दिवस आधी त्याबाबतची नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र सध्या लाखो कृषिपंपधारक शेतकऱयांचे वीज कनेक्शन नोटीस न देताच कापले जात आहे. तसेच अनेक रोहित्र बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे सदरच्या रोहित्रावरील ज्या ग्राहकांनी वीज बिल भरले आहे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराची वीज ग्राहक संघटनेने गंभीर दखल घेतली असून त्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा दिला आहे.