जय दिबा; २४ जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन



प्रेस मीडिया ऑनलाइन :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 आता बस पुरे झाले;  दिबांच्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत 'जय दिबा' असा जयघोष करत २४ जानेवारीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्यात येणार आहे.  लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समिती व इतर संघटनांची महत्वपूर्ण बैठक आज (शुक्रवार दि. २१) पनवेल शहरातील महात्मा फुले सभागृह (आगरी समाज हॉल) येथे कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली.  त्यावेळी हा निर्णय जाहीर करत यशस्वी होईपर्यँत आंदोलने करीत राहणार असल्याची गर्जना करण्यात आली. 

     


  प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत कायम उदासीन राहिलेल्या सिडकोच्या विरोधात २४ जानेवारीला विमानतळाचे काम बंद आंदोलन करून सिडकोला जोरदार दणका देण्यात येणार आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एकवटला आहे. यापूर्वी आंदोलने करत भूमिपुत्रांची ताकद सिडको आणि शासनाला दाखविण्यात आली आहे. नुकताच झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, आणि त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल असा एल्गार पुकारण्यात आला. दरम्यान सिडको व शासनाने अद्यापही त्यांची मुजोरी कायम ठेवली आहे, त्यामुळे २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन जोरदारपणे करण्यात येणार आहे, आणि या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असल्याचे या बैठकीत स्पष्ट दिसून आले. 

        

 या बैठकीस आमदार महेश बालदी, महापौर कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर सीता पाटील, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, रुपेश धुमाळ, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक हरेश केणी, नगरसेविका दर्शना भोईर, प्रमिला पाटील, राजेश गायकर, सुरेश पाटील, प्रेम पाटील, विजय गायकर, दीपक पाटील, रविनाथ पाटील, मनोहर पाटील, शैलेश घाग, समिती, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्यावे यासाठी सन २००८ पासून सिडकोकडे सातत्याने विविध संघटना,संस्था व प्रकल्पग्रस्तांची सातत्याने मागणी आहे. मागील वर्षी १० जून  साखळी आंदोलन, २४ जूनला लाखो भूमिपुत्रांच्या उपस्थितीत सिडको घेराव आंदोलन, ०९ ऑगस्ट क्रांती दिनी गावागावात मशाल मोर्चा झाला.   तर १३ जानेवारी २०२२ रोजी भूमिपुत्र निर्धार परिषद अशी लक्षवेधी ऐतिहासिक आंदोलने झाली. दुसरीकडे सिडकोने या सार्वत्रिक मागणीकडे दुर्लक्ष करीत याविषयी गुपचूप केलेला ठराव विखंडित करण्याचा निर्णय आजवर घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर १३ जानेवारी रोजी झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत विमानतळ बाधित २७ गावांच्या प्रलंबित समस्या सोडवण्या विषयी सिडकोस अल्टिमेटमही देण्यात आला होता.याकरिता पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने २० जानेवारीस सिडको प्रशासनाबरोबर २७ गाव विमानतळ बाधित प्रतिनिधी आणि विमानतळ नामकरण कृती समिती प्रतिनिधी यांची सिडको भवनात बैठक घेण्यात आली. मात्र सिडको प्रशासन थातूरमातूर उत्तरे देत आपली नैतिक जबाबदारी टाळत असल्याचे बैठकीत स्पष्ट दिसून आले. त्यामुळे विमानतळाचे काम बंद पडल्या शिवाय सिडको वठणीवर येणार नाही, त्यामुळे २४ जानेवारीला विमानतळाचे काम बंद पाडण्याचे सर्वानुमते घोषित करण्यात आले आहे. कोविडचा प्रोटोकॉल पाळून सिडकोच्या मुजोरी विरोधातील या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले.


कोट- 

  दिबासाहेबांचे नाव विमानतळाला द्यावे आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, हि आमची आग्रही मागणी आहे.  'आधी पुनर्वसन मग प्रकल्प' हे शासनाचे धोरण असतानाही शासन दुर्लक्ष करत आहे. आणि यामध्ये राज्य शासन उदासीन आहे.राज्य शासनाची भूमिका प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टिकोनातून मारक  आणि घातक आहे,  त्यामुळे राज्य शासनावर खटला दाखलच केला पाहिजे. कालच्या बैठकीत सिडकोच्या एमडींचा सकारात्मक दृष्टिकोन नव्हता. पाहतो, बघतो हि भूमिका सिडकोने बैठकीत प्रदर्शित केली. त्यामुळे २४ जानेवारीला प्रकल्पग्रस्ताच्या सर्व संघटना एकत्र येऊन लाक्षणिक काम बंद आंदोलन करणार असून जो पर्यंत दिबांचे नाव लागत नाही तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाही तो पर्यंत आंदोलने सुरूच राहतील. -  दशरथदादा पाटील 

कोट- 

सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून गोर गरिबांचे कैवारी लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळावे आणि ती आपली भूमिपुत्रांची अस्मिता आहे. प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सिडको करीत आहे.  पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार काल सिडको अधिकाऱ्यांसोबत सर्व पक्षीय कृती समिती, २७ गाव समिती पदाधिकारी यांची बैठक झाली. सिडकोने केलेला ठराव विखंडीत करून दिबासाहेबांच्या नावाचा ठराव करा तसेच २७ गावातील प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावा असे या बैठकीत सिडकोला ठणकावून सांगण्यात आले.मात्र त्या बैठकीत सिडकोने प्रत्येक विषयात टाळाटाळ केली, थातुरमातुर उत्तरे देत, चार दिवसात पुन्हा चर्चा करू अशी संधीसाधू पणा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक बाबतीत सिडकोची उदासीनता यावेळी दिसून आली. प्रकल्पग्रस्तांचे बोलणे,रडणे त्यांना ऐकू येत नाही. त्यामुळे २४ जानेवारीला आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाला किमान १० हजार भूमिपुत्र उपस्थित राहतील. 

                                                                              - माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर


जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा : 

 85 30 83 87 12

Post a Comment

Previous Post Next Post