जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे आणि धरणे या ठिकाणी पर्यटनासाठी येण्यास पुन्हा बंदी घालण्यात आली
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे आणि धरणे या ठिकाणी पर्यटनासाठी येण्यास पुन्हा बंदी घालण्यात आली आहे.या ठिकाणांपासून एक किलोमीटर परिसरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढत आहे. त्यामुळे राज्यात ८ जानेवारीपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मनोरंजन उद्याने, प्राणिसंग्रहालय, वस्तू संग्रहालये, किल्ले, सशुल्क ठिकाणे आणि कार्यक्रम, स्थानिक पर्यटन स्थळे बंद राहतील, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांतील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
ही आहेत बंद करण्यात आलेली पर्यटनस्थळे
- मावळ तालुका - भुशी धरण, घुबड तलाव, लोणावळा धरण, तुंगाली धरण, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन पूल, वलवण धरण, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिविलग पॉइंट कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला आणि पवना धरण परिसर
- मुळशी तालुका - लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी, काळवण परिसर.
- हवेली तालुका - घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर.
- आंबेगाव तालुका- डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ.
- जुन्नर तालुका- शिवनेरी किल्ला, सावंड किल्ला, हडसर किल्ला आंबे हातवीज, वडज धरण,
माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र - भोर तालुका- रोहिडेश्वर गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर धरण, आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड.
- वेल्हा तालुका- तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर.