प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी (मुन्ना ) शेख :
पुणे - जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील टेंडर कारकुनाच्या कपाटावर छापा घातल्यावर शंभरहून अधिक कामांची इस्टिमेंट गेले दीड ते दोन महिने दडपून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.तसेच तांत्रिक निविदा उघडल्यानंतर 'फायनान्शियल बिड' ओपन करताना लघुत्तम निविदाधारकाला निरोप न पाठविता दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांच्या ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्याचा प्रकार देखील घडला आहे. या मुळे बांधकाम विभागातील टेंडर घोटाळ्याने खळबळ उडाली आहे.
उत्तर बांधकाम विभागामध्ये हा घोटाळा झाला असून कार्यकारी अभियंता पी. एस. माने यांनी टेंडर कारकून संजय मठ यांच्या कपाटाची अचानक तपासणी केली. त्यामध्ये 132 कामांच्या मान्यतेसाठी सादर केले इस्टिमेट दडवून ठेवल्याचे आढळून आले. जिल्हा परिषदेने शंभर दिवसांत कामे पूर्ण करण्याची मोहीम हाती घेतली असताना त्याला टेंडर कारकून यांच्यामुळे ब्रेक लागल्याचे उघडकीस आले आहे. दडवून ठेवलेल्या कामांच्या फाइल्स ताब्यात घेऊन संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी वाटप करून देण्यात आल्या.
मात्र, याप्रकरणी तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी या कपाटाची झडती घेतली. पण, हे आदेश येण्यापूर्वी त्यांनी टेंडर कारकुनाकडे का चौकशी केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, 100 दिवसांत कामे पूर्ण करण्याच्या मोहिमेमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. तर दुसरीकडे बांधकाम विभागातील हा गोंधळ सुरू आहे. त्यावर सदस्य अतुल देशमुख यांनी प्रत्यक्ष विभागात जाऊन या प्रकरणी जाब विचारला.