प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे : जेजुरी - तीर्थ क्षेत्र जेजुरी गडावर देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दोन्ही लस घेतलेल्या असतील तरच प्रवेश देण्याचा निर्णय मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळाने घेतल्याची माहिती प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांनी दिली आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 6) विश्वस्त मंडळाची बैठक झाली. करोनाची तिसरी लाट आल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. यात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भाविकांना देवदर्शनासाठी गडकोटात प्रवेश देणे,
भाविकांसाठी मास्क आवश्यक, गडकोटच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर बूथ बसवणे, सुरक्षित अंतर ठेवून देवाचे मुख दर्शन आदी निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारातूनच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे तर, पूर्व आणि पश्चिम द्वारातून बाहेर जाण्याचा मार्ग ठेवण्यात येणार आहे.
याशिवाय, पुढील काळात महाशिवरात्री, पौष, माघ पौर्णिमा यात्रा येत आहेत. याकाळात ही कडक नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमात कोणतीही शिथिलता आणली जाणार नाही. बैठकीला प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे पाटील, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, सॉलिसिटर ऍड. प्रसाद शिंदे , ऍड. अशोक संकपाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप उपस्थित होते.