प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे -सिटी सर्व्हे झालेल्या मिळकतींचे सातबारा उतारे बंद करून त्याठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहेत. यासाठी भूमि अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे.प्रायोगिक तत्वावर हवेली तालुक्यामध्ये या प्रणालीचा वापर करून माहिती जमा केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर राज्यभरात हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दिली.
महापालिकेच्या हद्दीत यापूर्वी भूमी अभिलेख विभागाकडून सर्व मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे भूमि अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिटी सर्व्हे झाला असेल तर सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणे आवश्यक आहे. मात्र, तरीसुध्दा सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख वापरण्यात येते होते. ही पध्दत टाळण्यासाठी अशा भागात फक्त प्रॉपर्टी कार्डच ग्राह्य धरले जाणार आहे.
गैरप्रकार रोखणे शक्य…
प्रॉपर्टी कार्ड हे एकच रेकॉर्ड मालमत्ते संदर्भात तपासले जाणार असल्याने निर्णय प्रक्रिया वेगाने होणार आहे. यापूर्वी प्रॉपर्टी कार्ड आणि सातबारा उतारे हे दोन्ही सुरू होते. यामुळे सातबारा उताऱ्याच्या आधारे जमिनीचे व्यवहार होत होते. प्रत्यक्षात मात्र प्रॉपर्टीकार्डवरील नोंद पाहिली जात नव्हती. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले. सातबारा उताऱ्यावर रस्त्याचे क्षेत्र याची नोंद नसते, त्यामुळे रस्त्याचे क्षेत्र दाखवून व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रॉपर्टी कार्डवर मिळकतीचे सविस्तर वर्णन, क्षेत्राची नोंद आणि नकाशा असल्याने गैरप्रकार रोखणे शक्य होणार आहे.